
हजारो तरुणांचे भविष्य उजाळले..
स्थानिक : मुर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सातवी ते पदवीधारक तरुण तरुणी सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शिक्षण व रोजगाराचे महत्व पटवून दिले. उद्घाटनप्रसंगी डॉ. सुगत वाघमारे यांच्यासह युवा उद्योजक तिक्ष्णगत वाघमारे, जॉब कनेक्ट चे संचालक रघुराम गायकवाड , महाराष्ट्र राज्य बाल हक्क सौरक्षण आयोग सदस्य ॲड. संजय सेंगर, अकोला जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, निसर्ग प्रेमी शरद कोकाटे, ए.जी.एम. वाय.सी.एफ. वैभव कुलकर्णी, संस्थेचे सचिव विष्णुदास मोंडोकर यांच्यासह विशाल शिंदे, श्रीकांत पिंजरकर, अमित खांडेकर तथा अनेक मान्यवर व हजारो तरुण तरुणी उपस्थित होते.

यावेळी मुर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्या सह जिल्हाभरातून युवक युवतींनी हजेरी लावली. मेळाव्यात मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलीटी, टेलिकॉम व इतर, आय. टी, बि.पी.ओ./ के.पि.ओ., फार्म या क्षेत्रातील सुमारे ८३ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्याचे वैशिष्ट असे की पात्र तरुण तरुणींची मुलाखत घेऊन लगेच अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. सदर मेळाव्यात ५ हजार ९०० तरुण तरुणी सहभागी झाले असून सुमारे दीड हजार तरुण तरुणींना अपॉइंटमेंट लेटर्स देण्यात आले. कार्यक्रमाकरिता तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
