अकोला: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आज प्रमिलाताई ओक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. मंत्री गोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव गि-हे होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार बळीराम शिरस्कार, संतोष शिवरकर, जयंत मसने, सुभाष सातव, गणेश काळपांडे, ॲड. प्रकाश दाते, मनोहर उगले, प्रा. अशोक राहाटे, संजय तडस, ललित काळपांडे, वनिताताई राऊत, महेश गणगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री गोरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक विकासकामांना वेग मिळाला आहे. संत शिरोमणी सावता माळी यांच्या समाधी परिसराच्या विकासासाठी शिखर समितीची मान्यता मिळाली असून हे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव (जि. सातारा) येथे स्मारक उभारणीसाठीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.”
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडले.