
अकोला,(प्रतिनिधी) –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह, तेल्हारा येथील विद्यार्थी आदित्य सावळे (रा. अडगाव, ता. तेल्हारा) याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ही घटना बाभुळगाव रोडवर काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात एका शिक्षकाचा जागेवरच मृत्यू झाला असून, आदित्यने आज सकाळी ९ वाजता शासकीय रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, आदित्य सावळे काल सायंकाळी ६.२० वाजता वस्तीगृहातून बाहेर पडताना सेक्युरिटी गार्डला “मी ग्राउंडवर जाऊन येतो” असे सांगून गेला होता. मात्र, रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान बाभुळगाव रोडवर दुचाकी अपघात झाला. अपघातात सोबत असलेले शिक्षक जागीच ठार झाले आणि गंभीर जखमी झालेल्या आदित्यला तत्काळ अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे वस्तीगृहासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आदित्य हा होतकरू, अभ्यासू व खेळाडूवृत्तीचा विद्यार्थी होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने मित्रमंडळी, शिक्षकवर्ग आणि वस्तीगृहातील अन्य विद्यार्थी हळहळ व्यक्त करत आहेत.
वस्तीगृह प्रशासनाकडून चौकशी सुरू
या घटनेनंतर वस्तीगृह प्रशासनाने तात्काळ घटनेची नोंद घेतली असून, विद्यार्थ्याच्या बाहेर जाण्यावर नियंत्रण, आणि त्याच्या हालचाली याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.