- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 23 : गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे रामनगरातील सौ. शा. वा. नाईकवाडे गोसेवा धाम येथे आयोजित जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, सुभाष जैन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. एन. अरबट आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गोशाळेचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व पशुसंवर्धनाला संशोधनाला चालना मिळावी. इतर जिल्ह्यातील संस्थांचे अनुकरणीय प्रयोग आत्मसात करून आपल्या जिल्ह्यात आदर्श कार्य उभे करावे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत नियमित पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यासाठी आवश्यक तजवीज व निधीची तरतूद केली जाईल.
आयोगातर्फे पुढील काळात तालुकास्तरीय गोआधारित शेती प्रशिक्षण आयोजित करणार असल्याची माहिती श्री. सूर्यवंशी यांनी दिली. गोशाळांचे पर्यवेक्षण आयोगाकडून केले जाते. जिल्ह्यात 32 गोशाळा असून, त्यातील 23 आयोगाकडे नोंदणीकृत आहेत. उर्वरित गोशाळांनीही नोंदणी करून घ्यावी. जिल्ह्यात 2 लाख 33 हजारहून अधिक गोवर्गीय पशुधन आहे, असे डॉ. बुकतरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
गोशाळा व्यवस्थापन, देशी गोवंश संवर्धन व अनुवांशिक सुधारणा, आहार जागा व्यवस्थापन, गोठा स्वच्छता आदी विविध विषयांवर श्री. सूर्यवंशी, डॉ. प्रवीण बनकर, डॉ. ए. एच. कोडापे यांनी मार्गदर्शन केले. नोंदणीकृत गोशाळांचे प्रत्येकी दोन याप्रमाणे 46 संचालकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.



