अमरावती:-
धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर येथे दिक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांचा टोल मोफत करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे.
12 ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर येथे दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी वर एकत्र येतात व तेथून सामाजिक एकतेचा संदेश घेऊन जातात. अनेक आंबेडकरी अनुयायी लांब दुरून येतात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेप्रति आपली श्रद्धा व्यक्त करतात. यावर्षी आषाढी महिन्यात पंढरपूर येथे जाणाऱ्या वाहनांना राज्य सरकारने टोल मोफत केला होता. त्याच धर्तीवर नागपूर – अमरावती महामार्गवर नांदगाव पेठ येथे असणाऱ्या टोलवरून नागपूर येथे दीक्षाभूमी वर जाणाऱ्या संपूर्ण गाड्या मोफत सोडण्यात याव्या अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी टोल व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रिना गजभिये, अमरावती तालुका अध्यक्ष मयुरेश इंगळे, तिवसा तालुका महासचिव अमोल जवंजाळ, जिल्हा सदस्य प्रशांत गजभिये, अमरावती शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.