
तेल्हारा प्रतिनिधी (दि. ७डिसेंबर २०२२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (व्याख्याता तथा अभ्यासात फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विचारपीठावर भिमराव परघरमोल, गोपाल खोपाले, सिद्धार्थ बोदडे, विलास हिवराळे यांची उपस्थिती होती. प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला सिद्धार्थ बोदडे यांनी एक श्रद्धांजलीपर गीत सादर केले. त्यानंतर भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, मताधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारतीयांना सर्वात मोठी देन आहे. १९१८ ला साउथ ब्युरो कमिशनला केलेल्या मागणी पासून तर १९३२ ला झालेला जातीय निवाडा, पुणे करार व १९५० ला अमलात आलेल्या भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२५ व ३२६ मधील तरतुदी पर्यंतचे मताधिकाराचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच जाते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विलास हिवराळे यांनी केले तर सूत्रसंचालन धम्मपाल हिवराळे यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्राट युवा संघटना तथा गावकरी यांनी प्रयत्न केले.