
अकोट, दि. २५ एप्रिल २०२५ – अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे दिनदहाड घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अकोट ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवले आहे.
फिर्यादी शुभम तुळशीराम वानखडे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १८ एप्रिल रोजी त्यांच्या घराचे आणि कपाटाचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे १ लाख रुपयांचे सोन्याचे टॉप्स, चैन आणि २५,००० रुपये रोख चोरून नेले होते. हा प्रकार २३ एप्रिल रोजी उघडकीस आला.
या गंभीर गुन्ह्याची नोंद २५ एप्रिल रोजी अपराध क्रमांक २२२/२५, भादंवि कलम ३३१(३), ३०५(५), ३५१(२) नुसार करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत साहिल ऊर्फ गोलू विकास गाडगे (वय २३) या आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई अकोला जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंग, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे आणि सहायक पोलीस अधीक्षक श्री. अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
तपास पथकात पोउपनि. शिवानंद विर, पोहेकॉ. उमेशचंद्र सोळंके, हरिष सोनवणे, शिवकुमार तोमर, पोकॉ. रवि आठवले, उमेश दुतोंडे, गोपाल जाधव आणि शुभम लुंगे यांनी मोलाचा वाटा उचलला.
अकोट ग्रामीण पोलिसांच्या या झपाटलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे