
विझोरा : त्रिरत्न बुद्ध विहार स्मारक समिती, विझोरा व समस्त गावकरी बौद्ध मंडळ यांच्या वतीने विझोरा ता. बार्शिटाकळी येथे दिनांक २० मार्च, २०२५ ते २५ मार्च, २०२५ पर्यंत भव्य ६ दिवसीय धम्म तत्त्वज्ञान व श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता ” *संविधानाचा अमृत महोत्सव व आजची परिस्थिती”* या विषयावर सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान प्रचारक प्रा. डॉ.एम.आर.इंगळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. प्रथमतः तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर पूज्य भंते विजयकिर्ती महाथेरो यांनी उपस्थित श्रामनेर संघ आणि उपासक उपासिका यांनी त्रिशरण व दशशील देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॉ.एम.आर.इंगळे यांनी संविधानाचा अर्थ, संविधान निर्मिती आणि मूलभूत हक्क यावर भाष्य करतांना आजची वास्तव स्थिती स्पष्ट केली. लोकांचे हक्क धोक्यात आले असून स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वावर आधारलेले आहे ती बुद्ध धम्माचीच तत्त्व आहेत. म्हणून ज्यांना न्याय, समता आणि बंधुता मान्य नाही त्या प्रतिगामी शक्ती सत्तेत जाऊन संविधानाची पायमल्ली करत आहेत. यासाठी आम्ही सगळे बहुजन जबाबदार आहोत. कारण आम्हाला संविधानाची ओळख नाही. ज्या संविधानाने देशातील सर्व नागरिकांना मूलभूत हक्क बहाल करून माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य व संरक्षण दिले. मतदानाचा अनमोल हक्क देऊन आम्हाला मतदार राजा केले. त्या संविधानाला आम्ही आजही राष्ट्राचा सर्वोच्च ग्रंथ मानत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.

त्यासाठी आजच्या काळात संविधान जागृती करणे आणि संविधानशील माणूस घडविणे आवश्यक आहे. तेव्हाच संवैधानिक सक्षम भारत घडविला जाऊ शकतो. त्यासाठी संविधानाचा विचार माणसाच्या मनात रुजविणे गरजेचे आहे असे कळकळीचे आवाहन केले. त्यानंतर पूज्य भंते विजयकीर्ती यांनी आपले विचार व्यक्त करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील प्रवेश आणि केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांच्या त्यागाची आठवण ठेवा आणि माणूस म्हणून जगण्याचा मार्ग स्वीकारा असे आवाहन केले. याप्रसंगी पूज्य भंते बोधानंद आणि पूज्य भंते माहानाम यांची उपस्थिती होती.याप्रसंगी डॉ.एम.आर. इंगळे यांनी पूज्य भंते आणि त्रिरत्न बुद्ध विहार समितीला “भारतीय संविधान मानवी हक्कांची सनद” ग्रंथ भेट दिलेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवई यांनी केले. कार्यक्रमाला श्रामनेर संघ आणि गावातील उपासक उपासिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.