चान्नी : “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी चान्नी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू धंद्यावर मोठी कारवाई करत गुन्हेगारीच्या मुळावर घाव घातला.
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून व मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (बाळापुर) गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रविंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीच्या आधारे ग्राम अंधारसांगवी शेतशिवार गाठले.
कारवाईदरम्यान ब्रम्हदेव सिताराम लठाड (वय 34, रा. अंधारसांगवी) हा गावठी हातभट्टी लावून अवैध दारू गाळताना रंगेहाथ पकडला. पंच व पोलीस स्टाफच्या उपस्थितीत आरोपीकडून सडवा मोहमाचे भरलेले 42 डब्बे (किंमत ₹42,000), 25 लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ₹2,500) व इतर साहित्य असा एकूण ₹44,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(क, ड, फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करत आहेत.

