
अकोला (२७ एप्रिल २०२५) :
अकोला शहरातील बस स्थानक परिसरात सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत महिलेला सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने शिताफीने अटक केली आहे. या महिलेकडून १० गुन्ह्यांत चोरीस गेलेले एकूण ८० ग्रॅम २९० मिली सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे ३,०९,१३८ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २७ एप्रिल रोजी ग.भा. पंचफुला गुलाबराव माळवे, रा. सुकळी उबार, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या दोन मुली अकोला बस स्थानकावर आल्या असताना, बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरीस गेले. चोरीला गेलेल्या सोन्याच्या पोतीची किंमत अंदाजे ३०,००० रुपये होती.
याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिसांनी अप.क्र. १४३/२०२५, भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बस स्थानक परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून, पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे टॉवर चौक परिसरात संशयित हालचाली करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत तिने आपले नाव कीर्ती रोहित गायकवाड ऊर्फ कीर्ती सागर वानखडे (रा. पिवंदळ खुर्द, ता. तेल्हारा, जि. अकोला) असे सांगितले व सदर गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कौशल्यपूर्ण चौकशीत तिने सिव्हील लाईन पोलिस ठाणे हद्दीत यापूर्वी घडलेल्या १० चोरीच्या गुन्ह्यांतील सहभाग मान्य केला.
हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
एकूण हस्तगत दागिने : ८० ग्रॅम २९० मिली
एकूण किंमत : ₹३,०९,१३८
या कामगिरीसाठी पोलिस अधीक्षक श्री. बच्चनसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सतीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयवंत सातव व त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेमुळे यश मिळाले. या पथकात पो.उपनिरीक्षक दिनेश पवार, तसेच पो.हे.कॉ. सुरेश लांडे, किशोर सोनोने, विजय भटकर, भूषण मोरे, प्रशांत शिरसाट, अक्षय तायडे, उमेश यादव, मंगेश चुन्नीवाले, जयश्री अबगड, दिपाली नारनवरे, भाग्यश्री देशमुख, व रामा पवार यांचा मोलाचा सहभाग होता