दोन दहशतवादी, दोन ओलीस, पोलिसांचे दमदार ऑपरेशन! मुर्तिजापूर बसस्टँडवर ‘मॉक ड्रिल’; कमांडोंनी केली थरारक कारवाई

मुर्तिजापूर (जि. अकोला) | प्रतिनिधी
दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी कशा प्रकारे तत्पर आणि समन्वयात्मक कारवाई करावी, याचा प्रत्यय येणारा मॉक ड्रिल गुरुवारी (दि. ८) सायंकाळी मुर्तिजापूर बस स्टँड परिसरात राबवण्यात आला. बसस्थानक व्यवस्थापक कार्यालयात दोन दहशतवाद्यांनी दोन नागरिकांना ओलीस धरल्याचा बनाव करून सुरू झालेल्या या थरारक सरावात, अकोला पोलिस दलाच्या विविध विशेष पथकांनी प्रत्युत्तर देत एक दहशतवादी ठार केला, तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले.

या सरावात RCP (Riot Control Police), QRT (Quick Response Team), BDDS (Bomb Detection and Disposal Squad), श्वान पथक, स्थानिक पोलिस कर्मचारी व अधिकारी अशा एकूण ९९ पोलिसांचा सहभाग होता. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

कारवाईचा थरार असाच होता:
सायंकाळी ५.०२ वा. सुरू झालेल्या या सरावात, बस स्टँड व्यवस्थापक रूममध्ये दोन दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस धरल्याचा बनाव करण्यात आला. काही वेळातच QRT पथक दाखल होऊन व्यूहरचना केली. एका दहशतवाद्याला जागीच ठार करण्यात आले, तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत जेरबंद करण्यात आले. श्वान पथक ‘रॅम्बो’च्या मदतीने स्फोटकांचा शोध घेण्यात आला. BDDS पथकाने परिसर निर्जंतुकीकरण करत सुरक्षेची खात्री केली. सर्व ओलीस नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दहशतवादाविरुद्ध सज्जता:
हा सराव जिल्ह्यात अशा आपत्तीजनक प्रसंगी पोलिस दल किती तत्पर आणि सक्षम आहे, याचे उदाहरण ठरले. नागरिकांमध्येही दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर जागरूकता निर्माण झाली.

विशेष उपस्थिती:
या सरावात पोलिस उपनिरीक्षक विशाल पांडे (ATB अकोला), पो.नि. अजित जाधव (मुर्तिजापूर पो.स्टे), RCP, QRT व BDDS पथकांचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते.


Leave a Reply

Your email address will not be published.