
बार्शीटाकळी (जि. अकोला) – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीस आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून बार्शीटाकळी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार गोवंश जनावरांना कत्तलीच्या तावडीतून सुखरूप वाचवले आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना कठोर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन बार्शीटाकळीच्या हद्दीत गस्त व पेट्रोलिंग सुरू असताना, दिनांक ०६ जून २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, दहेंडवेस (ता. बार्शीटाकळी) येथे चार गोवंश निर्दयपणे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आले आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला असता, एक गाय व तिची तीन गोरे असे एकूण चार गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयपणे आखुड दोरांनी बांधलेली आढळून आली.
गोवंशांची एकूण अंदाजित किंमत रु. १,०५,०००/- असून सर्व जनावरे पोलिसांनी जप्त केली आहेत. पुढील देखभाल व संगोपनासाठी ती जनावरे आदर्श गोसेवा संस्थान, म्हैसपूर येथे हलविण्यात येणार असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वात पार पडली.
या धडक कारवाईत पोलीस अंमलदार राजेश जौधारकर, पंकज पवार, रवींद्र देशमुख, नागसेन वानखडे, सचिन टकोरे, ईश्वर पातोंड, मनिष घुगे, अमोल हाके, गोविंद सपकाळ, मनोज सावदेकर, तसेच होमगार्ड शंकर जाधव यांचा मोलाचा सहभाग राहिला.