
बाळापुर(प्रतिनिधी) :
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील सातरगाव शिवारात रविवारी दुपारी एक अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ एक अपघात की यामागे काही संशयास्पद कारण आहे, याबाबत परिसरात तर्कवितर्क सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मृतदेह आढळून आल्याची माहिती शेतकरी अमोल विजयसिंह परीहार (वय ४०, रा. बाळापुर) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जून २०२५ रोजी दुपारी १ ते १.३० दरम्यान ते आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता, विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे :
वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, उंची सुमारे १७२ से.मी., रंग निमगोरा, चेहरा लांबट, डोक्याचे केस काळे, दाढी व मिशा किंचित वाढलेल्या अवस्थेत. मृत व्यक्तीने काळ्या रंगाची लोअर पॅन्ट परिधान केली होती. विशेष म्हणजे उजव्या हाताच्या मनगटावर दिलाच्या आकारात ‘A/B’ असे टॅटू स्वरूपात लिहिलेले आहे, जे ओळखीचा महत्वाचा दुवा ठरू शकतो.
या घटनेची नोंद मर्ग क्र. ३४/२०२५ अन्वये करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता कलम १९४ (B.N.S.S.) नुसार पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल जुमळे व पो.ह.वा. संजय टाले यांनी तातडीने दाखल होत पाहणी केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ही आत्महत्या आहे की घातपात?
सध्या मृत इसमाच्या ओळखीचा थांगपत्ता लागलेला नसून, त्याची पार्श्वभूमी, मृत्यूचे कारण आणि शेतशिवारात पोहोचण्यामागील कारणे याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विशेष म्हणजे, शरीरावरील टॅटू आणि परिधान केलेले कपडे यावरून तो ग्रामीण भागातील नसून कदाचित शहरातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांचे आवाहन
या व्यक्तीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती असलेल्या नागरिकांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन बाळापुर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
📞 पो.नि. अनिल जुमळे – ९९२३०५४४४५
📞 पो.ह.वा. संजय टाले – ९८२२९४०१९९
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृत इसमाची ओळख पटवणे आणि मृत्यूमागील खरे कारण समोर येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. बाळापुर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून, सत्य उघड होईपर्यंत हे प्रकरण गूढच ठरणार आहे.