
सध्या महाराष्ट्रात इतर सर्व जीवनावश्यक मुद्दे झाकण्यासाठी अनावश्यक मुद्दे कसे चर्चेत राहतील याचाच प्रयत्न सत्ताधारी करताना दिसतात. औरंगजेब क्रूर होताच. छत्रपती शिवरायांचा आणि स्वराज्याचा शत्रू होताच. त्याने स्वराज्याला आणि छत्रपती शिवरायांना प्रचंड त्रास दिला, त्यांचा अपमान केला. म्हणून जर औरंगजेबाची कबर उखडून टाकायची असेल, तर छत्रपती शिवरायांविरोधात लढणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या, त्यांच्या जिवंतपणी आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा अपमान करणाऱ्यांचाही आढावा आपल्याला घ्यावाच लागेल.
यात प्रथम आपण घेऊयात मिर्झाराजे जयसिंग यांना. औरंगजेबाचे साम्राज्य वाढावे, औरंगजेबाला त्रास देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पराजित करावे यासाठी औरंगजेबाने त्याच्या दरबारातील त्याचा अत्यंत प्रामाणिक सरदार मिर्झाराजा जयसिंग याला पाठविले. जयसिंगाने औरंगजेब जिंकावा आणि छत्रपत्री शिवाजी महाराज पराभूत व्हावेत याकरिता कोटी चंडी यज्ञ केला. त्यासाठी महाराष्ट्रातील ४०० ब्राम्हणांनी या यज्ञाचे अधिष्ठान केले, मिर्झाराजाला मदत केली. याच जयसिंगामुळे शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला, स्वराज्यातील काही किल्ले परत करावे लागले, आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात जावे लागले आणि कैद व्हावे लागले. औरंगजेबाने याच मिर्झाराजा जयसिंग याच्या सन्मानार्थ बुरहानपूरमधील ताप्ती नदीच्या काठावर छत्री (स्मारक) उभारली, ज्याला आता ‘राजा की छत्री’ म्हंटले जाते. ही छत्रीसुद्धा औरंगजेबाच्या कबरीसोबत उखडून टाकली पाहिजे. मोघलांना मदत केलेल्या सर्वच देशद्रोह्यांची स्मारके, समाध्या, स्मृतिस्थळे उखडून टाकली पाहिजेत. मिर्झाराजाला त्या कोटीचंड यज्ञात मदत केलेल्या ४०० ब्राम्हण पुजाऱ्यांची आणि अफजल्याला मदत करत शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची वंशावळ शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
सावरकरांनी त्यांच्या समग्र वाङ्मयाच्या 6 व्या खंडात शेंदापूरचा गणपती या प्रकरणात लिहून ठेवलंय की 'शिवाजीचे चरित्र ऐकून ऐकून तुमचे कण किटले असतील, शिवाजी हा जुना आदर्श झालाय नवा आदर्श आमचा नरू न्हावी आहे. नरू न्हाव्याचा वस्तरा शिवाजीच्या तलवारीपेक्षा जास्त चमकतो.' हा छत्रपती शिवरायांचा किती मोठा अपमान आहे? सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर लिहितात की, 'शिवाजी हा काकतालीय न्यायाप्रमाणे (योगायोगाने) राजा झाला." म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला या म्हणीप्रमाणे शिवराय राजे झाले. त्यात त्यांचं कर्तृत्व-पराक्रम काहीच नव्हता. हेच सावरकर संभाजी महाराजांना बदफैली, राज्यबुडवा, नादान बिघडलेला राजपुत्र म्हणतात इतक्या वाईट शब्दात दोन्ही छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सावरकरांचे मुंबईतील शिवाजी पार्क जवळील सावरकर सदन आणि अंदमानातील सेल्युलर जेल मधील सावरकरांना ठेवलं होतं ती खोली अशी दोन्ही स्मारके आधी उखडून टाकली पाहिजेत.
त्यानंतर माधव गोळवलकर याने छत्रपती शिवरायांबद्दल आणि देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या राजपूत राजांबद्दल अत्यंत विकृत आणि अपमानास्पद लिखाण केलेले आहे. आपल्या ‘विचारधन या पुस्तकाच्या पण क्र 259 वर ते लिहितात की, “राजपुतांचे बलिदान हे त्यांच्या पराक्रमाचे, स्वाभिमानी व निर्भय वृत्तीचे निदर्शक आहे यात शंका नाही; परंतु त्याचबरोबर ते विकृत व आत्मघाती आकांक्षेचेही प्रतीक आहे. भारतीय इतिहासाच्या शौर्यगाथेमधील तो एक संस्मरणीय परंतु दुःखद अध्याय आहे. क्षात्रधर्मासंबंधीच्या चुकीच्या धारणेमुळेच, या वीरपुरुषांनी हौतात्म्याची आकांक्षा बाळगून आत्मनाश करून घेतला. हीही एक प्रकारची दुर्बलताच आहे. परिस्थितीचे दडपण असा झाल्यामुळे वैफल्याच्या भाराखाली नष्ट होऊन जाणे हा आपला आदर्श होऊ शकत नाही.” म्हणजे राजपूत राजांचे बलिदान हे विकृत व आत्मघाती आकांक्षेचे प्रतीक आहे आणि ते आपले आदर्श होऊ शकत नाही असे म्हणणारे गोलवळकरच अशा हिंदुत्ववाद्यांचे आदर्श आहेत किती हा विरोधाभास?
छत्रपती संभाजी राजेंना हे गोळवलकर स्त्रीलंपट आणि दारुड्या म्हणतात. पुढे याच विचारधन पुस्तकाच्या पण क्र 269 वर गोळवलकर छत्रपती संभाजी राजांबद्दल लिहितात की, “संभाजीला पकडून हालहाल करून त्याचा वध करण्यात आला’ असे लिहिले आहे. वध कुणाचा करतात ? मरणारा राक्षस किंवा दुष्ट असेल आणि मारणारा नायक किंवा पूजनीय असेल तर त्याचा वध म्हणतात. यामध्ये मारणारा नायक असतो. हत्या किंवा खून शब्द वापरताना त्यात मारणारा वाईट आणि मरणारा चांगला असा दृष्टिकोन असतो. संघ, हिंदू महासभा, भाजपचे लोक महात्मा गांधींच्या हत्येबद्दल ‘गांधीवध’ हा शब्द वापरतात कारण नथुराम त्यांना अतिप्रिय आहे. परंतु छ. संभाजी राजेंच्या हत्येबद्दल देखील ‘वध’ हाच शब्द वापरून गोळवलकरांनी त्यांच्या मनातील छत्रपती संभाजी राजेंबद्दल असलेली भावना स्पष्ट केली आहे. गोलवळकरांसाठी औरंगजेब हा नायक किंवा आराध्य असल्याशिवाय ते असा शब्द वापरणार नाहीत. मग औरंजेबाला नायक मानून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या या माधव गोलवळकरची नागपुरातील रेशीमबागेतील समाधी सुद्धा उखडून टाकली पाहिजे.
राम म्हणावं की हराम कळत नाही पण ह्या विकृत गडकरीने आपल्या राजसंन्यास नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय की "अरे शिवाजी म्हणजे मुठ दाबल्या साडे तीन फुट उंचीचा त्याची काय मात्तबरी सांगतोस देहू, म्हणे हिंदूपदपाच्छाइ उठवली ! काय रे मोगलाई मोडली आणि मराठशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते ? शिवाजी च्या राज्यात लिंबोणी ला आंबे आले की बकरी ने आपली पोर वाघ्या च्या पोराला दिली? की कणसा मधून माणसे उपजली ? अरे केले काय शिवाजी ने असे ? मोघलाईत हुकमती केसाची टोळी दाडीखाली लोंबत होती ती मराठशाहीत कवठी वर चढली, तेव्हढाच लाभ! शिवाजी नशीबाचा म्हणून त्याचे नाव झाले इतकेच! त्यातून खर सांगू ? शिवाजी ची लायकी चार चौघांना पुढे कळणार आहे". इतकं विकृत लिखाण आणि तेसुध्दा छत्रपती शिवरायांबद्दल? या राम गणेश गडकरी च्या नावाने असलेल्या सर्व इमारतींची नावे बदलून टाकावीत आणि नागपूरच्या सावनेर मध्ये या गडकरीची असलेली कबरसुद्धा ताबडतोब उखडून टाकायला हवी. हो कबरच कारण असे बोलणारे-लिहिणारे औरंगजेबाचेच वैचारिक वारसदार असू शकतात.
मागे छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे दीक्षांत समारोहात देखील “शिवाजी हा जुना आदर्श झाला, नवीन आदर्श नितीन गडकरी आहेत”. असे शिवरायांबद्दल विकृत वक्तव्य केले पण मग या काळ्या टोपीखालील मेंदू गहाण असणाऱ्या कोशियारी वर काय कारवाई झाली? त्याअगोदर नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम शिवरायांबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बोलला. राहुल सोलापूरकर बोलला. आणि प्रशांत कोरटकर ने तर शिवरायांचा एकेरी उल्लेख करत छत्रपतींबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले. ह्या शिवद्रोही छिंदम- कोरटकर यांचे घरं कधी उखडून टाकणार आहात? हे स्वतः ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारे कधी वरील सर्वांचे पुतळे जाळून त्यांच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी करणार आहात?
हे सावरकर, गोळवलकर, गडकरी, छिंदम आणि कोरटकर या सर्व एकाच विशिष्ट ज्ञातीबंधवांनी जितके अपमानास्पद शब्द छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि छ संभाजी महाराजांबद्दल वापरले इतके वाईट शब्द तर कधी औरंगजेबानेही शिवरायांबद्दल वापरल्याचा इतिहासात उल्लेख नाही. उलट शिवरायांच्या निधनाची बातमी ऐकून औरंगजेब दुःखी होऊन अल्लाहकडे दुवा करतो की ‘ऐ अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. एक नेक बंदा आ रहा है”. बरं छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांबद्दल वाईट बोलणारे हे सारे एकच ज्ञातीबांधव असतात. कधीच कुणी मुस्लिम दोन्ही छत्रपतींविषयी वाईट बोलत नाही. या ज्ञातीबांधवांकडून कधीच पेशवे, सावरकर, हेडगेवार, रामदास, गोळवलकर यांच्याबद्दल चुकूनही अपशब्द निघत नाही हा योगायोग असावा काय?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाकली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांना माझा एक प्रश्न आहे की, औरंगजेबाची कबर म्हणजे काय आहे? त्याच्या महानतेचे किंवा त्याच्या सत्तेचे उदात्तीकरण करणारी इमारत आहे? त्याच्या जीवनकार्याचा गौरव करणारे स्मारक आहे? नाही. ते आहे औरंगजेबाचं थडगं. फक्त थडगं. ते थडगं छत्रपती शिवरायांच्या आणि मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष आहे. औरंग्या शेवटी इथेच मेला पण मराठ्यांना पराभूत करू शकला नाही याचा ठोस पुरावा आहे. आज औरंगजेब असल्याचा पुरावा संपवला की उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षच इतिहासातून वगळून टाकतील. कारण त्यांना वि.दा. सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे "शिवाजी हा काकतालीय न्यायाप्रमाणे (योगायोगाने) राजा झाला." (त्यात त्यांचा पराक्रम कर्तृत्व काहीच नव्हतं) हेच सिद्ध करायचं आहे. औरंगजेबाची कबर गायब केली की २५ वर्षानंतरच्या पिढीला 'औरंगजेब नावाचा कोण मोघल बादशाह होता? छ. शिवाजी महाराज लढले कुणाशी? स्वराज्य कुणाची गुलामगिरी झुगारून उभं केलं? हे सांगण्याची गरजच पडणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा सगळा इतिहासच यांना पुसून टाकायचा आहे.
या लेखात मी फक्त औरंगजेब म्हणजेच मोगल हाच विषय घेऊन लिहिलंय. ब्रिटिश आणि स्वातंत्र्यालढ्याबद्दल लिहिलेलं नाही. ते लिहिलं तर अस्सल देशद्रोह्यांची यादी भलीमोठी होईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आली. निवडणुकांपूर्वी भाजपायईंनी जी जी आश्वासने दिली ती सगळी खोटी ठरली. देश आणि राज्य अगदी गळ्यापर्यंत कर्जात बुडाले आहे. बीडचे देशमुख हत्या प्रकरण, परभणी चे हत्या प्रकरण, बदलापूर, पुणे, नागपूर, मुंबई, बीड असा संपूर्ण महाराष्ट्रातच अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा चढता आलेख. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सपशेल फेल झालेले देवेंद्र फडणवीस. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीविर शासनाचे घुमजाव, शेतकरी आत्महत्या, फोडाफाडीचे व अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण, सरकारी यंत्रणांचा खुला गैरवापर, अदाणीच्या घशात घातलेली धारावी हे सर्व घोटाळे आणि अपयश झाकण्यासाठी भाजपने औरंग्याचा आधार घेतलाय. नाहीतर राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता असतांना हे कबर उखडून टाकतो हे बोलत बसले नसते. कबर आतापर्यंत उखडून टाकली असती. पण ह्या औरंगजेबी भाजपायी प्रवृत्तीला फक्त आणि फक्त घडवायच्यात दंगली कारण दंगल हे एकच अस्त्र आहे जे यांचे झाक झाकू शकते आणि यांची सत्ता वाचवू शकते. त्यामुळे दंगल घडवायची की ही दंगलखोर मंडळी सत्तेवरून घालवायची हे आपलं आपण ठरवायचं आहे.
लेखक :- चंद्रकांत झटाले
(वरील लेख लिहिणारे लेखक हे सुप्रसिद्ध पुस्तक मजबुती का नाम महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक असून इतिहास अभ्यासक आणि समीक्षक देखील आहेत.)