
अकोला : आंबेडकरी समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय इतिहास जेव्हा सिद्ध करायचा असेल तेव्हा फुले-आंबेडकरी वाड्:मयकोश हा त्यासाठी अस्सल स्त्रोत ठरेल असे मत ज्येष्ठ लेखक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी फुले-आंबेडकरी वाड्:मयकोशावर आयोजित चर्चा आणि चिंतन या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन केले.
अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात दीनबंधू फोरम आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कला, साहित्य व संस्कृती मंडळ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके, प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा येथील रवींद्र इंगळे चावरेकर, अमरावतीचे डाॅ. अशोक पळवेकर, वाई, मुंबई येथील डाॅ. जगतानंद भटकर हे भाष्यकार म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. डहाके म्हणाले की, कोश हा लेखकाचे वाड्:मय मूल्य लक्षात घेऊन निर्माण केला जातो. त्यातून लेखकाच्या सांस्कृतिक संघर्षाच्या प्रेरणा शोधता येतात. लेखकाला व त्याच्या वांग्मयीन कार्याला समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य वाङ्मयकोश करतो. वाड्:मयकोशाच्या काही एक प्रेरणा व विचारविश्व असते. शिस्त असते रचना तंत्र असते या सर्व बाबींचा उलगडा फुले -आंबेडकरी वाङ्मयकोशातून होतो. इतर कोशापेक्षा फुले आंबेडकरी वाङ्मयकोशाने लेखकाच्या अत्यंत विस्तृत नोंदी घेऊन आपले वेगळेपण सिद्ध केले म्हणून कोशकार डाॅ. महेंद्र भवरे व त्यांच्या संपादक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले. मा. रवींद्र इंगळे चावरेकर यांनी म्हटले की, फुले-आंबेडकरी वाड्:मयकोश हा दलित साहित्य निर्मितीचा पहिला कोश ठरतो. त्याला समाजापर्यंत पोहचविले पाहिजे. डाॅ. अशोक पळवेकर बोलताना म्हणाले की, दलित चळवळीचा सांस्कृतिक दस्तावेज म्हणून या कोशाची नोंद इतिहासात होईल. डाॅ. जगतानंद भटकर यांनी इतर कोशाच्या तुलनेत फुले-आंबेडकरी कोशाचे वेगळेपण आणि महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय फुले-आंबेडकरी वाङ्मयकोशाचे समन्वयक व संपादक मंडळ सदस्य डाॅ. अशोक इंगळे केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संपादक मंडळ सदस्य डाॅ. भास्कर पाटील आणि आभारप्रदर्शन डाॅ. कैलास वानखडे यांनी केले. डाॅ. अशोक शिरसाट, डाॅ. संजय पोहरे, विजय दळवी, विश्वनाथ शेगावकर, डाॅ. चिंतामण कांबळे, प्रशांत असनारे, संदीप देशमुख, प्रा. भास्कर धारणे, प्रा.दिवाकर सदांशिव, मोहन शिरसाट, शेषराव धांडे, डाॅ. शत्रुघ्न जाधव, प्रशांत वंजारे, डाॅ. विलास तायडे, सुरेश साबळे यांच्यासह कार्यक्रमाला अकोल्यातील आणि अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, पत्रकार आणि प्राध्यापक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.