अकोला (प्रतिनिधि):अकोला ते अकोट रेल्वे उड्डाणपूल मार्गावर सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून, काही खड्डे तर तब्बल 2 ते 3 फूट खोल आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.
पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून जात असल्यामुळे ते दिसतच नाहीत – परिणामी वाहनचालकांना वेळेत अंदाज येत नाही आणि अपघात घडण्याची शक्यता दाट आहे. आधीच या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, त्यातच हे खड्डे वाहनचालकांसाठी मृत्यूचे आमंत्रण ठरत आहेत.
Table of Contents
🛑 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक धास्तावले!
हा रस्ता रेल्वे उड्डाणपूलाशी जोडलेला मुख्य मार्ग असल्याने शेकडो नागरिक रोज ये-जा करतात. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
“कोणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
📢 मागणी – तात्काळ खड्डे भरून अपघात टाळा!
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,
तात्काळ खड्डे बुजविण्यात यावेत
या मार्गावर वाहतूक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
लवकरात लवकर कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे
प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर भविष्यात घडणाऱ्या गंभीर अपघाताची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच राहील.





