
अकोला (प्रतिनिधी): शहरातील प्रसिद्ध लोहीया कंम्पाउंडमध्ये विविध कंपनीच्या इलेक्ट्रिक वायर बंडल चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी यशस्वी कामगिरी बजावली आहे. तब्बल ₹३.११ लाखांच्या मुद्देमालापैकी ₹२.०० लाखांचा माल हस्तगत करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घटना कशी घडली?
फिर्यादी राजेश सत्यनारायण लोहीया (वय ५६, रा. लोहीया कंम्पाउंड, खोलेश्वर, अकोला) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती की, दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांच्या स्टोअरमधून विविध कंपन्यांचे एकूण ४७ वायर बंडल (अंदाजे किंमत ₹३,११,९५८/-) चोरीस गेले होते.
पोलिसांची जलद कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचने तपासाची चक्रे फिरवत विजय अंबादास उंबरकार (वय ३९, रा. शिवसेना वसाहत, अकोला) यास अटक केली. त्याच्याकडून २७ वायर बंडल (किंमत ₹२,००,५००/-) हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल किनगे आणि त्यांच्या पथकातील पोहवा. अश्वीन सिरसाट, पोहवा. अजय भटकर, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. किशोर येउल, पोकॉ. निलेश बुंदे, पोकॉ. शैलेश घुगे यांनी बजावली.
नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा धाक अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट होत आहे.