अकोला | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला असून, नव्याने नियुक्त झालेले पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी आज दिनांक २३ मे २०२५ रोजी आपला पदभार स्वीकारला. मावळते पोलिस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंह यांची नुकतीच समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४, नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या निरोप आणि नव्या अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी भव्य समारंभाचे आयोजन विजय हॉल, अकोला येथे करण्यात आले होते.
समारंभास अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रमुख, शाखा प्रमुख तसेच अन्य मान्यवर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मावळते पोलिस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या स्वागताने झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून अकोल्यातील सहकार्य, संघभावना आणि कार्यक्षम टीमच्या योगदानाबद्दल विशेष उल्लेख केला.
नवीन पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारून आपल्या भाषणात संघटनशक्ती, समन्वय आणि जबाबदारी या मूल्यांवर भर देत अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळण्याचा विश्वास व्यक्त केला. “सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर सहकार्याने जबाबदारी पार पाडावी,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केले, तर पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करून समारंभाचे सुंदर संचालन केले.
सदर सोहळा हा केवळ औपचारिकता नसून, जिल्ह्याच्या प्रशासकीय वाटचालीस एक नवा टप्पा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. नव्या पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बुरूज अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

