अकोल्यात रात्रीची कारवाई थरारक; गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यातील ५४९ वाहनांची तपासणी; ११२ समन्स व ८ हत्यार गुन्हे उघडकीस

अकोला : जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अकोला पोलीस दलाने दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजता ते २७ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात व्यापक अमावस्या नाकाबंदी आणि कोम्बींग ऑपरेशन राबविले.

या विशेष मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेप्रमुख आणि दुय्यम अधिकारी अशा एकूण ३६ अधिकारी व २०० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी बॅरेकेटिंग करून ५४९ वाहने तपासण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये ९१ कारवाया करून एकूण ४४,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, नाकाबंदी दरम्यान ११२ समन्स, ४१ जामिनपात्र वॉरंट व १९ पकड वॉरंटाची तामिली करण्यात आली. ५४ अभिलेखावरील निगराणीतील बदमाश व माहितीगार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत ११ कारवाया, कलम १४२ अंतर्गत १ केस, तसेच भारतीय हत्यार कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय, कलम ३३ आरडब्ल्यू अंतर्गत १२ कारवाया आणि कलम ११० व ११७ अंतर्गत ३७ कारवाया करण्यात आल्या. जिल्ह्यातील ४९ हॉटेल्स, लॉजेस तसेच ६३ एटीएम्सची तपासणी देखील करण्यात आली.

पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसण्यास मदत झाली आहे. भविष्यातही वेळोवेळी अशा प्रकारच्या व्यापक नाकाबंद्या व ऑपरेशन्स राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.