
अकोला (प्रतिनिधी):
श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव शांतता व सुव्यवस्था राखून पार पाडण्यासाठी अकोला पोलिस दलाने संपूर्ण तयारी केली आहे. आज (दि. ३ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी ५ वा. पोलीस लॉन, राणी महल येथे पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहर विभागाची शांतता समिती बैठक पार पडली.
बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीश कुळकर्णी, सर्व ठाणेदार, पोलीस अधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते व शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोनि मनोज केदारे (ठाणेदार खदान) यांनी केले. मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधून उत्सव काळातील अडचणींवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. सतीश कुळकर्णी यांनी सर्व मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करून संस्कृतीचे दर्शन घडवावे तसेच जातीय सलोखा जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
मा. पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंदमय वातावरणात सण साजरा करावा. पोलिसांनी यासाठी तगडा बंदोबस्त उभारला असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद दरम्यान महत्वाचे मार्ग, मिश्र वस्त्या व विसर्जन घाट परिसर ड्रोनद्वारे स्कॅनिंग केले जाणार आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून आक्षेपार्ह संदेश किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर तसेच संबंधित गटप्रशासकांवर कारवाई होईल, असेही अधीक्षकांनी स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना पोलिस दलाकडून पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती देत मंडळांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या बैठकीस शहरातील ३००-३५० गणेश मंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.