अकोला पोलिसांचा ‘प्रोजेक्ट त्रीनेत्र’ राष्ट्रीय पातळीवर झेपावला; NCRB मध्ये सादरीकरणाला दाद!

अकोला (प्रतिनिधी, प्रशिक मेश्राम):— जिल्हा पोलिस दलाचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम प्रोजेक्ट त्रीनेत्र याने आता राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांनी एनसीआरबी मुख्यालय, नवी दिल्ली येथे प्रकल्पाचे सादरीकरण करून राष्ट्रीय निवड समितीकडून विशेष प्रशंसा मिळवली.
महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या पाच आयटी प्रकल्पांमधून “बेस्ट आयटी प्रोजेक्ट स्पर्धा”साठी प्रोजेक्ट त्रीनेत्र ची निवड करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी किशन पनपालिया यांच्या सहकार्याने करण्यात आली असून डेटा-आधारित प्रतिबंधात्मक पोलिसिंगचे हे प्रभावी मॉडेल ठरत आहे.
गुन्हेगारीत 48% घट
प्रकल्प सुरू होण्यापूर्वी (फेब्रुवारी–जुलै 2025) पुनरावृत्ती गुन्हे 114 होते; तर त्रीनेत्र लागू झाल्यानंतर (ऑगस्ट 2025–फेब्रुवारी 2026) ते 59 वर आले. एआय-आधारित मॉनिटरिंग, संशयित गुन्हेगारांवर सतत लक्ष, दर बुधवारी हजेरी व समुपदेशन यामुळे ही घट शक्य झाली, असे पोलिसांनी सांगितले.
प्रतिबंधक कारवाईतही यश
प्रकल्पाच्या सहाय्याने मोक्का अंतर्गत टोळीवर कारवाई, एमपीडीए कायद्यान्वये 21 गुन्हेगार स्थानबद्ध आणि कलम 55 ते 57 अंतर्गत 73 जणांना तडीपार करण्यात आले.
स्थानिक स्तरावर सुरू झालेला हा उपक्रम आता राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचल्याने जिल्ह्यासाठी ही अभिमानाची व ऐतिहासिक उपलब्धी मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.