अकोला पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद : ८०० पैकी ६१० उमेदवार उपस्थित, ३०७ पात्र

अकोला, प्रतिनिधी(प्रशिक मेश्राम):-अकोला जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आज पहाटेपासून उत्साहात सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात सकाळी ५ वाजता प्रक्रिया सुरू झाली. १६१ पदांसाठी एकूण ११,७८४ अर्ज प्राप्त झाले असून आज पहिल्या टप्प्यात बोलावलेल्या ८०० उमेदवारांपैकी ६१० उमेदवारांनी उपस्थिती लावली.
उपस्थित उमेदवारांपैकी ५४४ उमेदवारांनी शारीरिक चाचणीत सहभाग घेतला. त्यापैकी २५ पेक्षा अधिक गुण मिळवत ३०७ उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. भरती प्रक्रियेत शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी तसेच कागदपत्र पडताळणीचा समावेश असून महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ नुसार ही प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे.
उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, मोबाइल शौचालय, ध्वनीप्रणाली आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ओळख पडताळणीसाठी डिजिटल फोटो, बायोमेट्रिक व RFID तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही व व्हिडिओ चित्रीकरणाखाली पार पडत आहे.
भरतीसाठी उमेदवारांनी आधारकार्ड, सहा पासपोर्ट फोटो, १२ वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला किंवा एसएससी प्रमाणपत्र, अधिवास, जात, नॉन-क्रिमीलेअर, ईडब्ल्यूएस/एसईबीसी (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे मूळ व दोन प्रतींसह सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व प्रमाणपत्रे ७ डिसेंबर २०२५ पूर्वीची असणे आवश्यक आहे.
बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली असून चाचणीदरम्यान केळी, बिस्कीट व ग्लुकोजचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, “भरती करून देतो” अशा आमिषांना बळी पडू नये, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. भरती प्रक्रियेसाठी कोणतेही पैसे लागत नाहीत. कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (१०६४), पोलीस मुख्यालय (०७२४-२४४५३०५) किंवा नियंत्रण कक्ष (०७२४-२४३५५००) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.