
अकोला | (प्रतिनिधी, प्रशिक मेश्राम):– गुन्हे शाखेने दोन महिन्यांपासून फरार असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिताफीने अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलाच्या तांत्रिक तपास व गोपनीय माहिती संकलन क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे ३१ डिसेंबर २०२५ रोजी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोपाल रामकृष्ण दांदळे (वय ४८, रा. बसेरा कॉलनी, मलकापूर, अकोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५(१), ७९, २९६, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता व वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. आरोपीचा मोबाईल बंद असल्याने तपास अधिक कठीण झाला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवणी शिवापूर रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळवली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून रेल्वे स्थानकाबाहेर येत असताना आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. आरोपीच्या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून पुढील चौकशी सुरू आहे.