अकोला, दि. १५ –
अनेक वर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरूणीची सरकारने फसवणूक केली असून भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकेल ही जाचक अट टाकत क्रिमीलेयर लावल्याने पोलिस होण्यासाठी मेहनत करणारे उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे.इतर पदांच्या नियुक्ती साठी इव्हेंट साजरा करणा-या राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द करण्याची मागणी वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून अटी रद्द न केल्यास युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही युवा आघाडीने दिला आहे.
राज्यात पोलिस शिपाईच्या १८ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक ७००० जागा मुंबई आयुक्तालयांतर्गत आहेत. यामध्ये एका जिल्ह्यात शहर, ग्रामीण व लोहमार्ग पोलिस अशा गटांत भरती होत आहे. मात्र, कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये घातलेली आहे.२०१९ पर्यंत उमेदवारांना कोणत्याही जिल्ह्यातील भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी होती. त्यामुळे एका जिल्ह्यात संधी गेली तरी दुसया जिल्ह्यात सहभागी होण्याची शक्यता होती. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील, त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता, परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही, असा अर्ज बाद ठरविला जाणार आहे.तसेच क्रिमीलेयरची अट देखील आहे.त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो बेेरोजगार अनेक तरुण तरुणीने हवालदील आहेत.
एकतर शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते. अशावेळी पुन्हा तयारी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते. मात्र, आता ती मिळणार नाही. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.ह्या सर्व उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली.मात्र सरकारने त्यावर कुठल्याही पद्धतीने बदल केलेला नाही.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत ही भरती सुरू झाली आहे, अश्यावेळी जाचक अटी टाकून आणि बंधने लादून सरकारने बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याचा खेळ खंडोबा सुरू केला आहे. एकीकडे रोजगार आणि नौकरी देण्याचे नुसते इव्हेंट साजरे करायचे आणि दुसरीकडे अश्या जाटक अटी घालून त्याना संधी नाकारले जाणे हा अन्याय असल्याने वंचित युवा आघाडी त्वरित शुद्धीपत्रक काढण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे केली आहे.