
अकोला | प्रतिनिधी(प्रशिक राजू मेश्राम)
शासनाने जीवघेणा ठरवून पूर्णतः प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची बेकायदेशीर विक्री अकोला शहरातील शंकर नगर अकोट फाईल परिसरात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली असून, पोलीस स्टेशन अकोट फाईलच्या पथकाने वेळेत कारवाई करत अभय देवानंद भोसले (वय १९, रा. शंकर नगर, अकोट फाईल) या तरुणास अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा नायलॉन मांजाच्या घातक वास्तवावर प्रकाश पडला आहे.
दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. रहीम शेख यांना नायलॉन चायनीज मांजाची विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पोलीस हवालदार प्रशांत इंगळे, हर्षल श्रीवास, व पोलीस कॉन्स्टेबल ईमरान शाह यांच्या पथकाने शंकर नगर परिसरात छापा टाकत आरोपीस रंगेहात पकडले.
छाप्यात आरोपीकडून “MONO KITE FIGHTER” लेबल असलेले काळ्या रंगाचे ३३ नायलॉन मांजाचे बंडल/रील, प्रत्येकी किंमत ₹१,२००, असा एकूण ₹३९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मांजा दुचाकी चालक, पादचारी, तसेच पशुपक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा क्रमांक
६१६/२५,
भारतीय न्याय संहिता कलम ११०, २२३ तसेच
पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ४, ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर करीत आहेत.
विशेष म्हणजे, नायलॉन मांजामुळे यापूर्वीही शहरात दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर जखमा होणे, पशुपक्ष्यांचे मृत्यू, तसेच जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत. शासन, पोलीस प्रशासन व विविध सेवाभावी संस्था यांच्याकडून सातत्याने जनजागृती करूनही आर्थिक फायद्यासाठी काहीजण नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोनि शेख रहीम, सपोनि जनार्धन खंडेराव, पोउनि अख्तर शेख, पोहवा प्रशांत इंगळे, हर्षल श्रीवास, पोका ईमरान शाह, अमिर, व लिलाधर खंडारे सहभागी होते.
👉 नायलॉन चायनीज मांजा म्हणजे केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर समाजाच्या सुरक्षिततेवर थेट आघात आहे.
अकोट फाईल पोलिसांची ही कारवाई म्हणजे “शून्य सहनशीलता” धोरणाचा स्पष्ट संदेश असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे