ओबीसींनी आपले शत्रू आणि मित्र ओळखावे — ॲड. प्रकाश आंबेडकर

परभणी (प्रतिनिधी) — परभणी येथील सखा गार्डन येथे झालेल्या सकल ओबीसी संवाद बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओबीसी समाजाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, “ओबीसी समाजाने आपले शत्रू आणि मित्र ओळखले पाहिजेत. ओबीसी समाज स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःशी प्रामाणिक राहिलेला नाही, हेच आजचे मोठे संकट आहे.”

ते पुढे म्हणाले की, “ओबीसी समाजाने प्रस्थापित पक्षातील मराठा उमेदवारांना निवडून देऊन स्वतःच्या आरक्षणावरच घाला घातला आहे. आता वेळ आली आहे की ओबीसी समाजाने जागरूक होऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवावे.”

या संवाद बैठकीत परभणी जिल्ह्यातील अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. नागोराव पांचाळ (प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), डॉ. सुनिल जाधव (जिल्हाध्यक्ष, समता परिषद), प्रमोद कुटे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी उत्तर विभाग), मंचक हरकळ, नंदकिशोर कुमावत, डॉ. सलीम पाथरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी समाजातील विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून करण्यात आले होते. सभागृहात ओबीसी समाजातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.