अकोला : अकोला जिल्हा पोलिसांनी नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी दोन नवे उपक्रम सुरू केले आहेत. ‘प्रोजेक्ट रक्षा’ आणि ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ या प्रकल्पांचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व विजय हॉल येथे करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेडी यांच्यासह अनेक अधिकारी, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹 प्रोजेक्ट रक्षा म्हणजे काय?
प्रत्येक पोलिस ठाण्यात क्यूआर कोड लावला जाईल.
नागरिक तो कोड स्कॅन करून थेट पोलिस अधीक्षकांकडे आपली तक्रार किंवा अभिप्राय पाठवू शकतील.
फीडबॅक मराठीत तसेच इतर भाषांमध्येही देता येईल.
नागरिकांच्या समाधानावर आधारित प्रत्येक पोलिस ठाण्याला रेटिंग मिळेल.
👉 यामुळे तक्रारी दडपल्या जाणार नाहीत, सर्व माहिती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि पोलिसांची जबाबदारी वाढेल.
🔹 प्रोजेक्ट त्रिनेत्र म्हणजे काय?
संगणक आणि डेटा-सायन्स वापरून गुन्हे कुठे आणि कोणाकडून होण्याची शक्यता आहे हे आधीच ओळखले जाईल.
पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्या आरोपींची माहिती ठेवली जाईल.
प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी ‘हीट मॅप्स’ आणि ‘डॅशबोर्ड’ तयार होतील.
पोलिसांना गुन्हा घडण्याआधीच कारवाई करता येईल.
👉 यामुळे पोलिसिंग ‘गुन्हा घडल्यानंतर’ (reactive) न राहता ‘गुन्हा होण्याआधीच रोखणे’ (preventive) या पद्धतीने होईल.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या तंत्रज्ञान तज्ज्ञांचा तसेच गंभीर गुन्ह्यात आरोपीला राज्याबाहेरून पकडणाऱ्या एलसीबी टीमचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अकोला पोलिस दलाचा हा उपक्रम केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल. नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता या उपक्रमांमुळे अधिक दृढ होईल.”
समारंभाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन एसडीपीओ सुदर्शन पाटील यांनी केले.


