
अकोला(प्रतिनिध,प्रशिक मेश्राम): अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अखेर अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर (म.प्र.) येथून गाठले. तब्बल ५००० कि.मी. प्रवास, २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज व रेल्वे तपासणीनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
दिनांक ६ सप्टेंबर रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अप.क्र. २९९/२०२५ भा.न्या.सं. व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. गणेश विसर्जनासाठी घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून आरोपी समीरखान बैद (२८, रा. ठौर मोहम्मद प्लॉट, डाबकी रोड, अकोला) याने अल्पवयीन पीडितेच्या घरी घुसून चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला.
घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. आरोपीचे हातपाय कापणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले होते. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ विशेष पथक गठीत करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान, आरोपी सराईत गुन्हेगार असून तो सतत रेल्वे-बसने राज्यांतर प्रवास करत होता. त्याने भुसावळ, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, झांसी, भोपाल, गुना, ललितपूर, शिवपुरी, उज्जैन, देवास अशा अनेक ठिकाणी थारा बदलत पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सायबर व तांत्रिक विश्लेषणातून त्याचा मागोवा लागत गेला.
शेवटी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदौर बायपासवर मोठ्या शिताफीने सापळा रचून आरोपीस जेरबंद केले.
या कारवाईत पो.नि. शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, तसेच सायबर शाखेचे जवान सहभागी झाले.