मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

मुर्तिजापूर(प्रतिनिधी):खंडणी उकळणाऱ्या दांपत्याला मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. लता नितेश थोप (३०) व नितेश उर्फ निलेश प्रभाकर थोप (३९, रा. खरबढोरे, ता. मुर्तिजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घनश्याम बालचंद सोनी (५१, रा. रतनलाल प्लॉट, अकोला) या सोनार व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती-पत्नीने तब्बल १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळली.

१६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, अकोला येथे ओळख झालेल्या लता थोप हिने घरगुती समस्यांचा बहाणा करून फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर पतीसह कट रचून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवून सुरुवातीला तीन लाख, त्यानंतर हप्त्यांमध्ये एकूण १८ लाख ७४ हजार रुपये आरोपींनी घेतले.

यानंतर ३० ऑगस्ट रोजी आरोपींनी पुन्हा पाच लाखांची मागणी केली. त्यापैकी एक लाख रुपये देण्यासाठी फिर्यादी तयार झाले. पोलिसांनी सापळा रचताच आरोपींना अकोला-मुर्तिजापूर रोडवरील टोलनाक्यावर रोख रकमेसह पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत स.पो.नि. श्रीधर गुठ्ठे, पो.उप.नि. चंदन वानखडे यांच्यासह पथकातील जवान सहभागी झाले.

आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास पो.उप.नि. चंदन वानखडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.