बौद्ध युवकावर जीवघेणा हल्ला – वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

खामगाव (जि. बुलढाणा) –
जात पाहून केलेला हल्ला… रोहन पैठणकर या बौद्ध युवकावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याने खामगाव हादरलं आहे. रोहन याची स्थिती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर सध्या अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने अकोला हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण, महानगर प्रवक्ते रंजीत वाघ, रिजवान भाई, हैदर भाई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी रोहनची भेट घेतली. डॉक्टरांशी संवाद साधत, “या तरुणाची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी विशेष लक्ष द्या, कोणतीही त्रुटी होऊ नये,” अशा शब्दांत स्पष्ट सूचना दिल्या.
वंचित बहुजन आघाडीने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे की, “सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तुरुंगात टाका, अन्यथा महाराष्ट्रभर उद्रेक होईल.”

या हल्ल्याची जातीय पार्श्वभूमी लक्षात घेता, हे प्रकरण केवळ एका तरुणावरचा हल्ला नसून, मानवतेवरचा घाव आहे. “जात विचारून मारहाण करणाऱ्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या मूल्यांवरच काळं ढग आहे,” असं वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.