“किर्तनाच्या नावाखाली फसवणूक – आरोपीला एलसीबीकडून अटक”

तेल्हारा (जि. अकोला) | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या किर्तनकार आरोपीस एलसीबी अकोलाच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. ही धडक कारवाई रांजणगाव एमआयडीसीतील एका फ्लॅटमध्ये करण्यात आली.
घटना १९ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन तेल्हारा येथे दाखल अपराध क्र. २१३/२०२५ कलम ३७(२) भादंवि अंतर्गत घडली होती. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या माध्यमातून मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्याकडे विनंती केली होती.
या अनुषंगाने एलसीबीचे प्रमुख पोनि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू करण्यात आला. गावातील लोकांची चौकशी केल्यावर उघडकीस आले की, प्रदीप दामोदर लासुरकार (२५ वर्षे, रा. तळेगाव वडनेर) हा आरोपी गावात चार महिन्यांपूर्वी वारकरी सप्ताहासाठी किर्तन आणि पखवाज वादनासाठी आला होता. त्यावेळीच पीडित मुलीसोबत त्याची ओळख झाली होती.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सायबर शाखेच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा पुणे येथे लागला. एलसीबी पथकाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पुण्यातील रांजणगाव एमआयडीसीमधील फ्लॅटवर धाड टाकून आरोपीस अटक केली व पीडित मुलीची सुटका केली.
सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी पो.स्टे. तेल्हारा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच एलसीबी प्रमुख पोनि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.अं. सुलतान पठाण, राज चंदेल, सतीश पवार, राहुल गायकवाड, मनीष ठाकरे आणि सायबर शाखेचे पो.अं. गोपाल ठोंबरे यांनी केली.