ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध दारूचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शाखेची धाड – ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

नाईकजाम (ता. बार्शीटाकळी) | १५ जुलै २०२५

अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू विरुद्ध केलेली कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार अवैध दारू धंद्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी केलेल्या मोहिमेत ग्राम नाईकजाम येथे दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आज दिनांक १५ जुलै २०२५ रोजी ग्राम नाईकजाम येथे पंचासमक्ष दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या छाप्यात सुनील वामन चव्हाण (वय ३८, रा. नाईकजाम) याच्याकडून गावठी दारू आणि सडवा मोहाचे ४९० लिटर असे एकूण ७७,७५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या छाप्यात गोपाल किशन चव्हाण (वय ३८, रा. नाईकजाम) याच्याकडून १२० लिटर गावठी दारू व सडवा मोहाचा १८,२५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एकूण कारवाईत ६१० लिटर गावठी दारू व सडवा मोह मिळून अंदाजे ९६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध कलम ६५(ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेही, पोनि शंकर शेळके (स्थानीय गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली GPSI दशरथ बोरकर, पोहवा गोकुळ चव्हाण, पोकों स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, तसेच चालक मनिष ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध दारूविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेने पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तींना हादरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.