
अकोला (प्रतिनिधी) |
स्वच्छ भारत अभियान, ग्रामविकास खाते, आणि सरकारी दप्तरी लोककल्याणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, अकोला येथील पंचायत समितीच्या इमारतीत कार्यालयीन वेळेतच पुरुष व महिला स्वच्छतागृहे बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जनतेसाठी असलेली ही मूलभूत सुविधा डोळ्यासमोर असूनही, संबंधित प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष दिसत आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच महिला कर्मचाऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भातील फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, “स्वच्छ भारताचा प्रचार फक्त भिंतीवर, अमलात मात्र शून्य!” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे स्वच्छतागृहाचे दरवाजे कुलूपबंद असून, त्यावर “NO मास्क, NO एंट्री” असे जुन्या काळातील पोस्टर चिकटवलेले दिसत आहे. पण खरे प्रश्न म्हणजे NO ENTRY TO TOILET!
लोकांच्या करातून चालणाऱ्या कार्यालयात जर सामान्य माणसालाच स्वच्छतागृह वापरू दिले जात नसेल, तर हे प्रशासन नेमके कोणासाठी?
तरी संबंधित गटविकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.