अकोट (प्रतिनिधि)
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ व “श्री संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी” जळगाव नहाटे यांच्यावर हमीभावात ज्वारी खरेदी करताना शेतकऱ्यांची नावे वापरून खोटे ७/१२ दस्तऐवज तयार करून सरकारी कोट्यवधींचा अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे सखोल चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
🛑 भ्रष्टाचाराचा कारनामा कसा घडला?
वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, या संस्थांनी सब एजंट म्हणून ज्वारी खरेदी करताना
▪️ शेती न केलेल्या लोकांच्या नावाने खोटे ७/१२ दस्तऐवज तयार केले
▪️ खाजगी व्यापाऱ्यांकडून स्वस्तात खरेदी केलेली ज्वारी शासकीय दरात विकल्याचे दाखवले
▪️ आणि परिणामी सरकारचा मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला!
🧾 कोणकोण दोषी?
या घोटाळ्यात अकोटमधील काही संगणक चालक, सेतू केंद्र चालक, व काही एजंटांचे हात असल्याची शक्यता असून, खोटी नोंदणी, फसव्या कागदपत्रांची निर्मिती, आणि बनावट खरेदी व्यवहारांचे जाळे उघडकीस आणण्याची मागणी करण्यात आली.
📋 वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या:
- संबंधित सातबारा दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी
- ज्वारी साठवणूक व विक्रीचा बाजार समितीत तपास
- लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कोणते पीक विमा घेतले हे स्पष्ट करणे
- दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे
- संपूर्ण अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील खरेदी विक्री संघांची चौकशी
🗣️ यावेळी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, संगीता अढाऊ, निखिल गावंडे, गजानन गवई, मनोहर शेळके, प्रभाताई शिरसाट, वसंतराव नागे, पवन बुटे, पराग गवई, सुयोग आठवले, चेतन कडू, शुद्धोधन इंगळे आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
📣 “शेतकऱ्यांचे हक्क गहाण ठेवून भ्रष्ट मंडळींच्या खिशात सरकारचा पैसा जात असेल, तर तो प्रकार गप्प बसून पाहणार नाही… दोषींना शिक्षा झालीच पाहिजे!”
— असा ठाम इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.