
अकोला (प्रतिनिधी)– अकोला शहराच्या पोस्टे खदान परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर आधी लैंगिक अत्याचार, त्यानंतर लाकडी काठीने निर्घृण मारहाण, त्याचे चित्रीकरण आणि अखेरीस सोशल मीडियावर बदनामीचा खेळ… या सर्व अमानवी प्रकारांची मालिका उघड झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत, अवघ्या १२ तासांत चारही आरोपींना अटक केली. सदर पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाने पीडितेवर आधी शारीरिक अत्याचार केला आणि त्या प्रसंगाचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. काही दिवसांनी, दुसऱ्या एका मुलाकडून गिफ्ट का घेतले, या क्षुल्लक कारणावरून पीडितेला लाकडी काठीने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचाही व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. इतक्यावरच न थांबता, मागील व्हिडिओ टाकण्याची धमकी देऊन पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्यात आले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार झाला. तक्रारीवरून पोस्टे खदान पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ४८३/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता, पोक्सो कायदा, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. केवळ १२ तासांत दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले, तसेच गुन्ह्यात सहभागी असलेले खालील दोन प्रौढ आरोपी जेरबंद करण्यात आले: सलमान खान अयाज खान (वय २४, रा. कवाडे नगर, अकोला) अब्दुल साहील अब्दुल वाजीद (वय २०, रा. कैलास टेकडी, अकोला) सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक मा. अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पो. नि. मनोज केदारे, पोहेका निलेश खंडारे, अमित दुबे, नितीन मगर, संजय वानखडे, अभिमन्यु सदाशिव व रोहित पवार यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. पीडितेचा मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाच्या दृष्टीने पोलिसांकडून समुपदेशनाची व्यवस्था केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले सर्व व्हिडिओ आणि फोटोंचे सायबर फॉरेन्सिक विश्लेषण करून आरोपींवर कडक चौकशी सुरू आहे. — हा केवळ गुन्हा नाही, तर समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला दिलेला हादरा आहे. प्रशासनाने घेतलेली जलद आणि निर्णायक कारवाई कौतुकास्पद असली, तरी अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी समाजाच्या एकत्रित सजगतेचीही गरज आहे.