अकोला : जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अकोला पोलिसांकडून आकस्मिक नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ५७ इसमांवर कारवाई करण्यात आली असून, बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल ₹१,४९,५०० चा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जून रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही कारवाई झाली. जिल्हाभरात २४ नाकाबंदी ठिकाणी विशेष पथकांनी धडक तपासणी केली. या कारवाईदरम्यान एकूण १०६३ वाहने तपासण्यात आली व मोटार वाहन कायद्यान्वये २८८ प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय कलम १८५ अंतर्गत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या २ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५७ इसमांवर मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “शहराच्या शांततेत नागरिकांनी आपले योगदान द्यावे. कोणत्याही बेकायदेशीर कृत्यापासून दूर राहावे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. कायदा तोडणाऱ्यांना अजिबात सहानुभूती दाखवली जाणार नाही.”
अकोला पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शहरात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवावी, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.


