ऑपरेशन प्रहारचा दणका! अकोल्यात ४.८० लाखांचा २३ किलो गांजा जप्त

रामदासपेठ परिसरात अमलीपदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या तस्करांवर पथकाचा छापा; तीन संशयित ताब्यात

अकोला : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत एकामागोमाग एक धडक कारवाई केली जात असून, याच धर्तीवर दिनांक २९ मे २०२५ रोजी २३ किलो गांजा जप्त करत ४,८०,६५४/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर यांच्या विशेष पथकाने केली असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक सक्रिय झाले आहे. याअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोनि मनोज बहुरे यांच्या उपस्थितीत मनपा शाळा क्र. ०७ जवळील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी आसीफ अली फारुख अली (वय ३४, रा. इस्लामपूरा, अकोला) आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले.

२३ किलो गांजासह मोबाइल जप्त

तपासादरम्यान २३.२२ किलो (व्यावसायिक वजन) गांजा व १०,०००/- किंमतीचा स्मार्टफोन असा एकूण ४,९०,६५४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात NDPS कायद्याच्या कलम ८(c), २०(b), २०(ii)(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कौतुकास्पद भूमिका

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पथकात पो.उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार, पो.हे.कॉ. रवि घिवे, विनय जाधव, पो.कॉ. राज चंदेल, नदिम शेख, आणि प्रफुल्ल बांगर यांचा समावेश होता.


“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यापुढेही अशाच तडाखेबंद कारवाया सुरू राहतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.