‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! अकोल्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई; ३.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गॅस रिफिलिंग, वरली मटका जुगारावर तीन ठिकाणी धाड – सहा जण ताब्यात

अकोला : शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली. दिनांक २९ मे रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ३,८१,९६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रिफिलिंग

पो. स्टे. सिव्हील लाईन्स हद्दीतील कृषी नगर भागात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या अॅटोमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती स्थागुशाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

यावेळी राजकुमार महेंद्र सिरसाठ (वय ३३, रा. न्यु भीमनगर) व सुनिल शंकर गायकवाड (वय ४०, रा. शिवसेना वसाहत) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी ३ घरगुती गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे मशीन, एक अॅटो व अन्य साहित्य असा एकूण २,३८,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांविरोधात भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ तसेच भादंवि कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरली मटका जुगारावर दोन ठिकाणी धाड

दरम्यान, पो. स्टे. सिटी कोतवाली हद्दीतील काला चबुतरा भागात वरली मटका सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

कारवाईदरम्यान मोहम्मद फारूख मोहम्मद इकबाल (वय ४४) आणि मोहम्मद रफिक मोहम्मद कासम (वय ५४) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ९८,७६०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी टाऊन शाळेजवळील भागात वरली मटक्यावर कारवाई करताना अतुल चांदुरकर (वय ३२), संदेश शेगावकर (वय ४१) आणि अभिलाश ठाकूर (वय ३०) यांना अटक करण्यात आली. याठिकाणी ४५,२००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.

या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोउपनि माजीद पठाण, अंमलदार फिरोज खान, उमेश पराय, अब्दुल माजीद, रवि खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, एजाज अहमद, अशोक सोनोने, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, तसेच चालक अक्षय बोबडे यांनी सहभाग घेतला.


अवैध धंद्यांना थांबवण्यासाठी सुरू असलेली ही सर्जिकल स्ट्राईक कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.