अकोला पोलिसांचा दारूबाजांवर धडाकेबाज मोहिमेचा घाव!

९५ जणांवर कारवाई, ३०५ वाहने पकडली; १.४७ लाखांचा दंड वसूल

अकोला (प्रतिनिधी) :
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवणाऱ्या, रस्तोरस्ती दारू पिऊन हैदोस घालणाऱ्यांवर अकोला पोलिसांनी चांगलाच धडका दिला आहे. नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात जोरदार मोहिम राबवण्यात आली असून, ९५ इसमांवर कडक कार्यवाही करण्यात आली आहे.

ही विशेष कारवाई दिनांक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जिल्हाभरात राबवण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, इतर नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण ३५ नाकाबंदी ठिकाणी ११७८ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३०५ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत रु. १,४७,८००/- चा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.”

पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहावे, आणि कुठलीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

अकोला पोलिसांची ही कारवाई केवळ सुरुवात असून, पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, हाच संदेश पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.