“महिला, तरुणांचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेचे बळकटीकरण एसपी चांडक यांच्या अजेंड्यावर”

अकोला, २४ मे : अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कार्यकाळातील पहिलीच गुन्हे आढावा बैठक आज विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालयात घेत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत स्पष्ट दिशा दिल्या. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखा प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच सर्व अधिकाऱ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला आणि आपापल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यपद्धतीची माहिती सादर केली. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक चांडक यांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “महिला विरोधी गुन्ह्यांवर कठोर कार्यवाही हवी,” असे स्पष्ट करत त्यांनी अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित

गोपनीय माहितीच्या आधारे गोवंश तस्करी, चोरी तसेच अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले. अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट ओळखून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रभावी उपायांची मागणी करण्यात आली.

नशा व अमली पदार्थांवर कठोर कारवाई

युवकांना नशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अमली पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अवैध शस्त्रधारी तसेच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का अंतर्गत कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले.

सायबर गुन्हे आणि वाहतूक नियंत्रणावर भर

सायबर गुन्ह्यांवर तातडीने दखल घेऊन तपास गतीमान करण्यावर भर देण्यात आला. वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

शांतता राखण्यासाठी पोलिसांची सज्जता

आगामी सण-उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेवर बारीक नजर ठेवत शांतता कायम राखण्याचे निर्देश देण्यात आले. व्हिजिबल पोलिसिंग, नाईट पेट्रोलिंग आणि QR कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून नियंत्रण आणखी प्रभावी करण्याचा निर्धार अधीक्षकांनी व्यक्त केला.

या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी व्यापक रणनिती आखण्यात आली असून, येत्या काळात पोलीस प्रशासन अधिक कठोर आणि सजगपणे कारवाई करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.