अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याची तडफदार कामगिरी! अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांकाचा बहुमान!

अकोला(प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अकोला जिल्हा पोलीस दलाने जोरदार मुसंडी मारत पो.स्टे. अकोट ग्रामीण ने अमरावती परिक्षेत्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहर कार्यालयानेही मागे न राहता या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची घवघवीत कामगिरी केली आहे.

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ७ जानेवारी ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान राज्यभरातील शासकीय यंत्रणांमध्ये कार्यक्षमतेचा कस लावणारा १०० दिवसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात वेबसाईट सुधारणा, नागरिकाभिमुख सेवा, कार्यालयीन स्वच्छता, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, नवकल्पनांचा अवलंब अशा विविध निकषांवर कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले.

अकोला पोलीस दलाने झळाळलेले कामगिरीचे काही ठळक टप्पे पुढीलप्रमाणे:

डिजिटल युगात दमदार उडी: www.akolapolice.gov.in वेबसाईटमध्ये युजर फ्रेंडली सुधारणा. WhatsApp ChatBot (9404691022) च्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींवर झटपट कार्यवाही.

डायल 112 वर ‘रिअल टाईम’ प्रतिसाद: आपत्कालीन प्रसंगी पोलिसांची पोहोच वेगवान, विश्वासार्ह.

स्वच्छता मोहिमेचा झंझावात: पो.स्टे. परिसरातील जुनाट व जड वस्तूंचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन; ६१ बेवारस वाहनांचा लिलाव करून तब्बल ५ लाख रुपये शासन खात्यात जमा!

तक्रार निवारणात ठसा: “आपले सरकार” व “पीजी पोर्टल” वरील तक्रारींचा जलद निपटारा; नागरिकांच्या मनात विश्वासाची जपमाळ.

सुसज्ज कार्यालयीन रचना: अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र प्रसाधनगृह, नागरीक सहायता केंद्र यांची उभारणी.

गावोगाव संवाद: वरिष्ठ अधिकारी थेट पोलीस स्टेशन व गावभेटीवर; चौकी संवाद, मोहल्ला मिटिंग्सद्वारे जनतेशी थेट संवाद!

औद्योगिक विश्वासार्हतेचा पाया: MIDC, व्यापारी संघटना यांच्याशी समन्वय; गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह वातावरण.

कायदे व तंत्रज्ञानात पारंगततेकडे वाटचाल: नवीन कायद्यांवरील कार्यशाळा, ई-लर्निंग, ‘iGOT कर्मयोगी’ प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांचे सामर्थ्यवर्धन.

नवकल्पना… आणि सेवा: S.E.V.A (Service Excellence Victim Assistance) प्रणालीची अंमलबजावणी, हरवलेले मोबाईल शोधून परत देण्याचे मिशन, आणि विद्यार्थ्यांसाठी ‘Akola CARES’ उपक्रम.

ही भव्य कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणेला एका ध्येयाने प्रेरित केले.

“कार्यालयीन सुधारणा उपक्रम केवळ १०० दिवसांपुरता मर्यादित नसून, अकोला जिल्हा पोलीस दल त्याला एक संस्कृती म्हणून स्वीकारून लोकसेवेचा नवा आयाम उभा करेल,” असा ठाम विश्वास पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.