हॉटेलमध्ये चोरी; २४ तासांत पोलिसांची यशस्वी कामगिरी – सराईत गुन्हेगार गजाआड, १२,३०० रुपये हस्तगत
डीबी पथकाच्या सतर्कतेमुळे मामा बेकरी चौकातील हॉटेल चोरी प्रकरणाचा उलगडा

अकोला, ७ मे – मामा बेकरी चौक, अकोला येथील हॉटेल अशोका देहलीवाला मध्ये मध्यरात्री शटर तोडून चोरी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. परंतु कोतवाली पोलिसांनी केवळ २४ तासांत सदर गुन्ह्याचा छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली असून, चोरीस गेलेली १२,३०० रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
फिर्यादी गोपाल रतनलाल अग्रवाल (वय ५५, रा. कपीलानगर, गोरक्षण रोड, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ मे रोजी रात्री ११ वाजता ते ७ मे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांच्या मालकीच्या हॉटेल अशोका देहलीवाला या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केली. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. पोलिस निरीक्षक सुनिल किनगे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेतला.
अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख कासम उर्फ गुडडू शेख कबीर (वय ३०, रा. गाडगेनगर, जुने शहर, अकोला) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली १२,३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे कोतवालीसह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कारवाई पो.ह. अश्विन सिरसाट आणि पो.ह. ख्वाजा शेख यांनी केली असून, पोलिसांनी दिलेल्या जलद आणि अचूक प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, शहर पोलिस गुन्हेगारांना मोकाट फिरु देणार नाहीत.