४ महिन्यांत १२ गुन्हेगारांना शिक्षा; जलदगती तपासामुळे पीडितांना मिळतोय न्याय

अकोला, प्रतिनिधी –
महिला आणि बालकांवरील अत्याचार थोपवण्यासाठी अकोला पोलिस दलाने चार महिन्यांत दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात जिल्ह्यातील विविध अत्याचार प्रकरणांत पोलिसांनी वेगवान तपास करत एकूण १२ गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग व बालकांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
७ दिवसांत अटक, दोषारोपपत्र दाखल!
पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७४ अंतर्गत दाखल ९ प्रकरणांत केवळ ७ दिवसांत आरोपींना अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताच, खटल्यांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
Table of Contents
ठळक प्रकरणे:
१. नातेवाईकाकडून अत्याचार – २० वर्षांची शिक्षा
मुर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारात एका बालिकेवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार केला होता. तपास यंत्रणांनी बिनतोड साक्षी व पुरावे सादर करत आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यास भाग पाडले.
२. शिक्षकच ठरला शिकारी – ६ वर्षांची शिक्षा
बार्शी टाकळीतील शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल होताच त्वरीत कारवाई करण्यात आली. न्यायालयाने आरोपी शिक्षकास ६ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
इतर १० गुन्ह्यात शिक्षा:
महिला, विद्यार्थीनी व बालकांवरील विनयभंग प्रकरणांत अकोला पोलिसांनी प्रभावी तपास करीत १० आरोपींना १ ते ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षा मिळवून दिल्या. या कारवाईने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा मजबूत संदेश गेला आहे.
पोलिसांचा ठाम पाठपुरावा – गुन्हेगारांना कठोर शिक्षा
महिला व बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या विशेष लक्षामुळे गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून तपास अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात ठोस तपास, वेळेवर अटक, आणि प्रभावी न्यायालयीन प्रक्रिया यामुळे न्याय मिळवून देण्यात अकोला पोलिस दल यशस्वी ठरले आहे.