
अकोला | प्रतिनिधी
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याची प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या अकोला पोलीस दलाच्या २०२४ मधील उल्लेखनीय कामगिरीचा वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री आ. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले.
या प्रसंगी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभोजकर, महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला असून, वर्षभरातील गुन्हे उकल, गुन्हे तपास, दोषसिद्धी दर, प्रतिबंधक कारवाई, जनजागृती उपक्रम, बंदोबस्त आणि तांत्रिक यशांचा समावेश करण्यात आला आहे.
पालकमंत्री फुंडकर यांनी अकोला पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना, “सध्याच्या तंत्रज्ञानाधारित युगातही अकोला पोलीस दलाने जनतेचा विश्वास संपादन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे, हे निश्चितच गौरवास्पद आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. या प्रकाशन प्रसंगी अहवालाची प्रत अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली. नागरिकांमध्ये देखील या कामगिरीचा अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.