
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या गुन्ह्यांचा माग काढत खदान पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अवघ्या काही दिवसांत चतुर आणि चलाख आरोपींचा छडा लावत एक मोठा गुन्हेगारी साखळी उघडकीस आणली आहे.
घटना आणि तपासाचा थरार:
८ आणि ९ एप्रिल २०२५ रोजी गौरक्षण रोड परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्यात आल्या. या घटनांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात झाली.
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे बयान आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने आरोपींनी रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये बनावट आधारकार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारे मुक्काम केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, बनावट ओळखपत्र, मोबाईल नंबर आणि खोटा वाहन क्रमांक यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला.
तपासातला निर्णायक वळण:
दरम्यान, वर्धा येथेही अशाच प्रकारची चैन स्नॅचिंगची घटना घडल्याचे लक्षात आले. तपास अधिक खोलवर घेत असताना अकोला आणि वर्धा दोन्ही घटनांमधील साम्य लक्षात घेऊन पोलिसांनी वर्धा येथील लॉजेसमध्ये शोधमोहीम राबवली. आरोपींनी तेथेही बनावट माहिती देऊन थांबले असल्याचे उघड झाले.
संयुक्त तपास, सायबर तंत्रज्ञान आणि दोन्ही जिल्ह्यांच्या गुन्हे शाखेच्या समन्वयातून शेवटी आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
अटक आणि कबुलीजबाब:
२९ एप्रिल रोजी वर्धा येथील न्यायालयाच्या आदेशावरून वैभव नारायण अडोळे (२२) आणि रोहण मोहनराव हुनंकर (२२), दोघेही रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी अकोल्यातील दोनही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून २१ ग्रॅम वजनाचं, अंदाजे १.८० लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं.
गुन्हेगारीचा दीर्घ इतिहास:
वैभव अडोळे याच्यावर यापूर्वीही अमरावती, नागपूर, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, वर्धा येथे घरफोडी, चोरी व चैन स्नॅचिंगचे २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईतील शिल्पकार:
या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. शंकर शेळके, खदान पो.स्टे. चे पोनि. मनोज केदारे, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, माजीद पठाण यांच्यासह अंमलदार अब्दुल माजीद, वसिम शेख, सुलतान पठाण, रवि खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, अमोल दिपके, अशोक सोनवणे, राहुल गायकवाड आणि सायबर सेलचे गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी अथक मेहनत घेतली.
नागरिकांना दिलासा:
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.