
स्थानिक: अकोलादिनांक: २७/०२/२०२५मराठी भाषेला समृध्द असा 2225 वर्ष जुना इतिहास आहे. मराठी भाषेने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्याचे जतन अनेक संत,महानायक,लेखक,कवी,शाहीर, साहित्यिक यांनी केले आहे. नंतर त्याचे संशोधन रंगनाथ पठारे यांच्या समितीने केले. अशा अनेक साहित्यिकांच्या अथक परिश्रमाने 3 ऑक्टोबर 2025 रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पण जोवर ती भाषा व्याहराची भाषा होत नाही तोवर तिचे अस्तित्व कायम राहणे एक आव्हान ठरते म्हणून भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण व्यवहारिक अभिजाततेचे काय? असा प्रश्न विशाल नंदागवळी यांनी उपस्थित केला. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे ते बोलत होते.

ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरी केला जातो. त्या निमित्त मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास व्हावा म्हणून महविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा प्रमुख मार्गदर्शक म्हणून सार्थक वक्तृत्व अकॅडमी अकोला चे संचालक विशाल नंदागवळी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होतो. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ. सीमा लिंगायत होत्या. विचारमंचावर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नीलिमा शेरेकर, डॉ. शुभांगी परळीकर, डॉ. आशू भावसार, डॉ. गजानन डोईफोडे, डॉ. प्रशांत चराटे, प्रा. अंजुम शेख, ग्रंथपाल प्रतीक गुलभेले आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरात बी. एड. प्रशिक्षणार्थींनी मराठमोळा पेहराव करून नामदेव – तुकाराम अशा गजरात ग्रंथ दिंडी काढली. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामुहिकरीत्या संविधान उद्देशिकेचे वाचन आणि विद्यापीठ गीत गाण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेया भांडे तर वक्त्यांचा परिचय संध्या पातोडे यांनी करून दिला. बी.एड. प्रशिक्षणार्थी यांनी नृत्य, गीत, ओवी, भारुड, कविता आणि भाषण यांचे सादरीकरण करत मराठी संस्कृतीचे दर्शन करून दिले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.अशा उत्साहाने भरलेल्या वातावरणात ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सीमा लिंगायत यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे त्यासाठी महाविद्यालय नेहमी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. दैनंदिन जीवनात बोलीभाषेचा वापरच आपल्याला व्यावहारिक अभिजाततेचे दर्शन घडवू शकते. तेव्हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती वसु आणि कीर्ती जामुनकर यांनी केले तर आभार वेदांती बारब्दे यांनी केले.
