
अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवली जात आहेत . दि.14 फेब्रुवारी २०२५ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे सामाजिक व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे साहित्य व जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा हा सोहळा साजरा करण्यात आला . शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ . संजय तिडके, डॉ.विशाल कोरडे,बिनू पंडित या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे व सदस्य सौ.मेघा देशपांडे यांनी आपला वाढ

दिवस दिव्यांग बांधवांसोबत साजरा करण्याचे ठरवले. त्यातूनच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दिव्यांग बांधवांना साहित्याचे वितरण केले . आपल्या प्रास्ताविकात डॉ.विशाल कोरडे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले . संस्थेने गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांना दिव्यांगांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले . वाढदिवसाला अवाजवी खर्च न करता दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी विशेष करण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे डॉ.संजय तिडके यांनी प्रतिपादन केले . महिला सक्षमीकरणासाठी ही येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाईल . ज्या महिलांना या उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन अनामिका देशपांडे यांनी केले .संस्थे तर्फे या कार्यक्रमात शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्मिता मिश्रा, गणेश सोळंके,तन्वी दळवे, नयना लवंगे, सिद्धार्थ ओवे,नेहा पलन, राधिका ढबाले व विजय कोरडे यांनी सहकार्य केले .