अकोला तालुक्यातील कुंभारी, शिवणी व बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा, पिंपळखुटा व धाबा या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामात अनियमितता आढळून आल्याने नव्याने काम सुरु करण्याची मागणी होत आहे. तर बार्शीटाकळी ते पिंपळखुटा रस्त्यावर धूळ साचली असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, प्रशासनावर ठोस कारवाईची मागणी होत आहे.शिवणी, कुंभारी, विझोरा, पिंपळखुटा, धाबा प्रजिमा २० या मार्गावर रस्त्याचे काम सुरु होते. रस्ता कामात अनियमितता असल्याच्या तक्रारीमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबरला रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी रस्त्यावर कारपेट व सील कोट पूर्णपणे दबलेले व पूर्ण लांबी मध्ये खड्डे पडलेले आढळले होते. या ठिकाणी कारपेट व सील कोटने दुरुस्ती शक्य नाही व ते करण्यातही येऊ असे संबंधित अधिकाऱ्यांनी काम करणाऱ्या कंपनीला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. संबंधित कंपनीला २४ सप्टेंबर , १६ ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर असेतीन वेळा लेखी आदेश देवूनही संबंधित कंत्राटदार त्यांना जुमानत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या वेळकाढूपणा मुळे पिंपळखुटा ते बार्शीटाकळी मार्गावरील, नागरी वस्त्यांमध्ये या रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या गौणखनिजाच्या जड वाहनामुळे धूळ उडत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक नागरिक मोठे आंदोलन उभे करण्याच्या इराद्यात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून काम सुरु करण्याचे आदेश देतात की नागरिकांच्या जनभावना तीव्र होण्याची वाट पाहतात, हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश द्यावे व नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा.
अन्यथा मोठे आंदोलन उभे करु
• संबंधित यंत्रणाचे साटेलोटे असल्यामुळे सदर रस्त्याचे काम नियमानुसार झाले नाही ? नेमके कुणाचे हात दगडाखाली दबले आहेत का?, अशी शंका येण्यास वाव आहे. दोषी अधिकारी व नियमांनुसार काम न केलेल्या कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे. आमच्या घरात जड वाहतुकीमुळे धुळच धुळ येत आहे. आमच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा. अन्यथा आम्ही सर्व नागरिक मोठे आंदोलन उभे करु. – अमोल जामनिक, सामाजिक कार्यकर्ते, बार्शीटाकळी.