दिवंगत सुरेश वानखडे.. मा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील चळवळीची “धार” – सुरेश शिरसाट

श्रध्देय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील राजकीय पटलावर अकोला पँटर्न राज्यात नावारूपाला आला.गाजला, गाजतोय. या अकोला पँटर्नच्या जडणघडणीत अकोला जिल्ह्यातील ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे त्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील शिंदखेड (मोरेश्वर) येथील दिवंगत सुरेश वानखडे साहेब यांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल.1980 मध्ये अकोला जिल्ह्यात मा अॅड बाळासाहेब आंबेडकरांचा “सम्यक समाज आंदोलन समितीच्या” माध्यमातून सामाजिक कार्याचा झंझावात सुरू झाला.व पुढे लगेच “भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या” माध्यमातून राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.त्यास अकोला जिल्ह्याने भरभरून प्रतिसाद दिला. नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला अकोला जिल्ह्यात नव्याने भारतीय रिपब्लिकन पक्षाची (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नव्हे किंवा त्याचा स्वैर अनुवादही नव्हे) स्थापन करण्यात आली. दिवंगत बी आर शिरसाट यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जिल्ह्यात पक्षाचा विस्तार केला गेला.

पहिली जिल्हा कार्यकारिणी, सोबत जी तालुक्याच्या कार्यकारिणी करण्यात आल्या. त्या पहिल्या वहिल्या बार्शिटाकळी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सुरेश वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.अकोला तालुकाध्यक्ष दिवंगत दिलीप तायडे, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष दिवंगत सुरेश भाऊ वानखडे, पातूर तालुकाध्यक्ष दिवं देवमनराव खंडारे ,मुरर्तिजापूर ता.बरडे,अकोट ता.तेलगोटे, तेल्हारा ता.खोब्रागडे, अकोला ता. कैलास शिरसाट, बाळापूर ता. सिध्दार्थ वानखडे कारंजा ता के.पी.मेश्राम, वाशीम ता.पंडित अशी काहीशी ती पहिली तालुका अध्यक्षांची टिम होती.बी आर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मा बाळासाहेब आंबेडकरांच्या संदेश- विचार पोहचविण्यासाठी व संघटना बांधणीसाठी गावागावातून मुक्कामी पायी दौरा -पदयात्रा काढण्यात आली होती.तेंव्हा वाशीम जिल्हा अस्तित्वात नव्हता. अकोला जिल्ह्यातीलच हे क्षेत्र होते.त्यामुळे अर्थातच अकोला जिल्ह्याचा विस्तार पार आताच्या वाशीम जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकापर्यंत होता. सुरुवातीला ज्या तालुका कार्यकारिणी केल्या गेल्या त्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून, पदाधिकारी म्हणून व पुढे पक्षाचा प्रामाणिक पाईक म्हणून सुरेशभाऊ वानखडेंनी पक्षासाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्याग,समर्पण, निष्ठा, पराकाष्ठा, प्रामाणिकता यासारखे जे शब्दप्रयोग योजता येतील ते सर्व सुरेश भाऊंच्या कार्याप्रती योजावे लागतील. साडेपाच फुट उंचीचा, हळकुड्या बांधा असा सर्वसामान्य शरीरयष्टी असलेले सुरेश भाऊ निधड्या छातीचे, फौलादी हिमतीचे होते. गावात युवकांमध्ये प्रसिद्ध, गावात मानमरताब, संघटन कौशल्य, आक्रमक भाषण शैली त्यांच्या कडे होती.राहायला साधे खपराचे कौलारू मातीचे घर.घरी तीन चार एकर शेती.पक्ष कार्य करतांना ना घरावर लक्ष, ना बायको पोरांवर लक्ष.सतत आणि सतत रात्रंदिवस उपाशीतापाशी, कधी अर्धपोटी राहून पक्ष कार्य, लोकांचे पडेल ती कामे करण्यात स्वतः ला धन्य मानणारा हा माणूस खरा चळवळीचा शिलेदार होता.

श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर, पक्ष चळवळीच्या विरोधात “हूं” काढणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर देणारे सुरेश भाऊ आक्रमक होतेच सोबत बाबासाहेबांच्या “मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने तितकेच संयमी सुध्दा होते. जिल्ह्यात शिवसेनेने आक्रमक स्वरूप धारण केले होते. जिल्ह्यात जातियवादी वातावरण निर्माण करून दोन वेगवेगळ्या तालुक्यातील दोन गावात जाळपोटीच्या घटना घडविण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात सेनेचे गुलाबराव गावंडे (तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री राहिलेले) यांच्या नेतृत्वात सेनेचा धाक निर्माण करण्यात येत होता. गुलाबराव भाऊं म्हणजे पहीलवान शरीरयष्टी, उंच तितकेच भरेल बांधा.अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने गुलाबराव जी आले होते. तिथेच सुरेश भाऊ वानखडे सुध्दा परिसरात कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.झाले..! दोघांची भेट झाली. पक्ष कार्य व बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द गुलाबराव भाऊंकडून निघाले.संवादातून विसंवाद झाला. प्रकरण हमरीतुमरीवर आले. सुरेश भाऊंनी शिंगावर घेत आरेला कारेने उत्तर दिले. सरळ आक्रमक पवित्रा घेतला.कॉलर धरे पर्यंत मजल मारली. आवराआवर झाली. प्रकरण निस्तारण्यात आले.परंतु चळवळीच्या, पक्षाच्या विरोधात तो कोणीही असेल, मंत्री असेल किंवा पहीलवान असेल त्याची गय केल्या जाणार नाही हा संदेश आक्रमक शिवसेनेच्या विरोधात तेंव्हा गेला होता.

आपल्या शिंदखेड गावात तरूणांचा आखाडा चालवणाऱ्या सुरेश भाऊंना लाठीकाठी, दांडपट्टा व इतरही खेळ प्रकार सुरेशभाऊंना अवगत होते. सुरेश भाऊंचे निधन होऊन दहा वर्षे झाली तरी आजही तो तरूण/ तरूणींचा आखाडा सूरूच आहे. मागील वर्षी अकोलाच्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात ज्या आखाड्यांनी मिरवणुकीत उत्तम सादरीकरण केले त्यामध्ये शिंदखेडच्या आखाड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.समाजमाध्यमांमधुन लाठीकाठी खेळणाऱ्या महिलांचा व्हिडीओ राज्यात सर्वदूर गेला व त्याला खूपच लोकांनी लाईक केले.जिल्ह्यात दिवंगत बी आर शिरसाट यांचे नाव निघाले की,आपोआपच सुरेश वानखडे यांचे नाव निघते. एकमेकांना पुरक, जिवाला जीव देणारे म्हणून त्यांची ख्याती होती.जानेवारी 1992 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिप,पंस निवडणूका लढविण्यात आल्या. तेंव्हा तालुका अध्यक्ष म्हणून सुरेशभाऊंनी उत्तम कामगिरी बजावली होती. सर्वात जास्त पंचायत समितीचे उमेदवार व जिल्हा परिषद उमेदवार बार्शिटाकळी तालुक्यातून निवडून आले होते. बी आर शिरसाट हे राजंदा जिप सर्कल मधून निवडून आले होते. सुरेशभाऊंचे गाव शिंदखेड याच मतदारसंघात होते.(आजही आहे)

पं.स. मध्ये बहुमत मिळाल्याने बी आर शिरसाट यांना सभापती म्हणून मा बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली. तालुक्याची सत्ता मिळाल्याने बी आर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन संघटन मजबूत केले. पुढे मखराम पवार विधानसभेवर निवडून आणणे, बार्शिटाकळीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळ्याची स्थापना करणे,स्व.वसंतराव नाईक सभागृहाची स्थापना, बंजारा, मुस्लिम, कुणबी, ओबीसी,आदिवासी, आंबेडकरी समाजाला जोडण्यासाठी, त्यांचे शासकीय निमशासकीय, रूग्णालये, पोलीस स्टेशनातील कामे यासारख्या अनेक कामात सुरेशभाऊंनी बी.आरांच्या खांद्याला खांदा लावून कामे केली.कधी स्वतःच्या हिमतीवर तर पक्ष नेतृत्वाच्या सहकार्याने शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकांची कामं करत राहिले.सुरेशभाऊंना पंचायत समितीच्या निवडणूकीत दोनदा संधी मिळाली. परंतु दुर्दैवाने दोन्ही वेळा ते पराभूत झाले. खाणंपिणं काहीच नाही किंवा दुर्लक्ष, पक्ष कामाच्या निमित्ताने/ निवडणूकांच्या निमित्ताने तालुक्यात, जिल्ह्यात उपाशीतापाशी काम करताना हा माणूस जिद्दीने भिडत राहिला. पण शरीराने खंगत राहिला.दुखसुख आंगावर काढणे,दवाखान्याकडे दुर्लक्ष करणे प्रसिध्दीचा हव्यास नाही, मी मी करणे वा पुढे पुढे करायची सवय नाही, अतिशय स्वाभिमानी बाणेदारपणे ते पक्षात- समाजात वावरत राहिले.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आस्था व विश्वास असणारे सुरेश भाऊ दिवंगत एन एम लंकेश्वर गुरुजी, बी आर शिरसाट यांना ते आपला राजकीय गुरु मानत असत.पक्ष निर्मीतीच्या सुरुवातीच्या काळात पक्षाची पायाभरणी करताना अकोला जिल्ह्यात चारित्र्यसंपन्न, निर्व्यसणी, निष्ठावान, त्याग,समर्पणच्या भावनेने झटणारे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठी फौज फळी उभी राहली होती. इमानदारपणा, प्रामाणिकपणा, अहोरात्र काम करण्याची जिद्द, घरची मिठ भाकरी खाऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणारे,पक्षासाठी पदरचे चार पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती, पक्षादेश पाळण्याची मानसिकता, एकमेकांबद्दल आदराची भावना या सर्वाचा परिपाक म्हणून मा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारिप जिल्ह्यात भक्कमपणे उभा राहिला.

“तालुका पदाधिकारी ,सर्कल पदाधिकारी कार्यकर्ते ह्या जिल्हा कार्यकारीणीच्या रक्तवाहिन्या असतात.!” असे म्हणत लंकेश्वर गुरुजी, बी आरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विचार पेरले.पेरलेले,रूजविलेले संस्कार कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आत्मसात केले होते. आताच्या काही लोकांना गंमत वाटेल परंतु पक्षात तेंव्हा एकप्रकारे कौटुंबिक वातावरण जिल्ह्यात तयार झाले होते. पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांच्या सुख:दुखा:त धाऊन जात असत.हे सगळं वातावरण मी जवळून पाहिलेले आहे.तालुकाध्यक्षांची पक्षांतर्गत स्पर्धा चालायची.कोण चांगले काम करतो ते यासाठी.अकोल्यात 10-15-20 हजारोंचे मोर्चे निघायचे.तालुक्यातून मोर्चात आंदोलनात तालुकाध्यक्ष किती जास्त वाहने,कार्यकर्ते ,आंदोलक आणतो,सहभागी करून घेतो यासाठी स्पर्धा चालायची.माणसं जोडण्याची धडपड असायची.अकोला जिल्ह्याला आपली राजकीय कर्मभूमी केल्याने व सगळ्यात जास्त वेळ मा बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्याला दिल्यामुळे इतर जिल्ह्यांपेक्षा अकोल्याचे वातावरण फार वेगळे तयार झाले.बहुजन समाज जोडल्या जात होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत तालुकाध्यक्षांची मते,त्यांनी सुचविलेले उमेदवार पक्षश्रेष्ठी विचारात घेत असत.लोकं निवडून येत असत.आमदार, जिप,पंस, ग्रामपंचायत, सेवा सह.सोसायटी, बाजार समिती या निवडणुकीत पक्ष सहभाग घेत होता.लोकं निवडून यायला लागले.यातुनच अकोला पँटर्न जन्माला आला. मा बाळासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वंचित बहुजन हितवादी नेतृत्व व दिवंगत सुरेश भाऊ वानखडे व यासारखे असंख्य कार्यकर्ते चळवळीला लाभल्याने अकोला पँटर्न गाजतोय,गाजत राहील.दिवंगत सुरेश भाऊ वानखडे यांचे 10 वर्षांपूर्वी दुखःद निधन झाले. त्यांच्या अल्पायुषी काळात चिरकाल टिकणारे कार्य केल्याने ते आजही आपल्या कार्यरूपाने जिवंत आहेत.

माझ्या व माझ्या शिरसाट परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृतिस विनंम्र अभिवादन !!

– सुरेश रा.शिरसाट, अकोला दि.21.10.2024

Leave a Reply

Your email address will not be published.