अकोला विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
स्थानिक अकोला सोशल इंजिनिअरीगच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा बहुचर्चित अशा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असेल याची विरोधी पक्षांसह अनेकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.गेल्या दोन वर्षापासून डॉ. सुगत वाघमारे हे मूर्तिजापूर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी विविध पक्षातील इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे दिसून येत आहे. वंचितकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी डॉ. सुगत वाघमारे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते आणि अपेक्षेप्रमाणे सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. सुगत वाघमारे यांना मूर्तिजापूरमधून उमेदवारी घोषित केली.
काल घोषित करण्यात आलेल्या वंचितच्या १६ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत डॉ. सुगत वाघमारे यांची वर्णी लागली आहे. डॉ. सुगत वाघमारे यांनी बालके, महिला आणि उद्योगाच्या क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य सर्वश्रुतच आहे. धर्म आणि जातीपातीच्या वर जाऊन सर्वामध्ये मिसळणारा आपला माणूस म्हणून डॉ. सुगत वाघमारे सर्वांना परिचित आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची दखल घेवून वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. सुगत वाघमारे यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मूर्तिजापूर मधील मतदारांनी आपल्याला विधानसभेत पाठविल्यास मूर्तिजापूर परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकू, अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. सुगत वाघमारे यांनी व्यक्तयावेळी केली. सध्या मूर्तिजापूर मतदारसंघात डॉ. सुगत वाघमारे यांनी यशस्वीपणे राबविलेल्या परिवर्तन यात्रेचे वारे जोरदार वाहत आहेत. परिवर्तन यात्रेदरम्यान त्यांनी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विकासापासून वंचित असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघातील परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावले. या भागात युवकांसाठी रोजगार निर्मिती, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते तसेच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही डॉ. सुगत वाघमारे यांनी सांगितले. विकासाची सर्वदूर दृष्टी असलेले डॉ. सुगत वाघमारे यांना वंचितची उमेदवारी घोषित झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत तर वंचित बहुजन आघाडी पक्षात आणि संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.